'एआय’ तंत्रज्ञान शिक्षणासाठी नवी मुंबईत एज्युकेशन सिटी उभारणार! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा
वेव्ह्ज परिषदेत ऑस्ट्रेलिया आणि न्यूयॉर्क या जागतिक विद्यापीठांसोबत सामंजस्य करार
02-May-2025
Total Views |
मुंबई : नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत परदेशी विद्यापीठांना देशामत त्यांचे केंद्र उघडण्याची परवानगी मिळाली असून नवी मुंबई इथे सिडकोच्या पुढाकाराने एज्युकेशन सिटी उभारण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, २ मे रोजी केली.
वेव्हज परिषदेदरम्यान महाराष्ट्र पॅव्हेलियन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, वेव्हज् परिषदेसारख्या एका व्यासपीठाची जागतिक पातळीवर गरज होती. ही गरज ओळखून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पहिल्या वेव्हज् परिषदेचे आयोजन केले आणि त्याचे यजमानपद महाराष्ट्राकडे दिले राज्यासाठी ही एक मोठी संधी आहे.
"वेव्हज् परिषदेच्या निमित्ताने महाराष्ट्र सरकारने काही अत्यंत महत्त्वाचे सामंजस्य करार केलेले आहेत. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा, एनएसईने (NSE) वेव्हज् निर्देशांक सुरू केलेला आहे. ४३ कंपन्या, या दृकश्राव्य क्षेत्रातल्या आहेत, या कंपन्यांचा निर्देशांक सुरू झालेला आहे. त्यामुळे या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करत आणि एकूणच फायनान्शियल इकोसिस्टीम तयार करण्याकरिता हे अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचललेले आहे. हा वेव्हज इंडेक्स म्हणजे वेव्हजच्या यशामधला एक मुकुटमणी आहे," असे त्यांनी सांगितले.
दीड हजार कोटींची गुंतवणूक होणार!
ऑस्ट्रेलिया आणि न्यूयॉर्क या दोन जागतिक विद्यापीठांसोबत आज सामंजस्य करार केल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत, परदेशी विद्यापीठांना देशामध्ये त्यांचे केंद्र उघडण्याची परवानगी मिळाली असून नवी मुंबई इथे सिडकोच्या पुढाकाराने एज्युसिटी उभारण्यात येणार आहे. या एज्युसिटीमध्ये जागतिक दर्जाची १० ते १२ विद्यापीठे आपले कॅम्पस सुरू करणार आहेत. त्यातील दोन विद्यापीठांशी सामंजस्य करार करण्यात आला. सुरुवातीला दीड हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. पण भविष्यात ही गुंतवणूक वाढत जाणार आहे. आणखी तीन महत्त्वाच्या विद्यापीठांशी चर्चा सुरू आहे. देशातले जागतिक विद्यापीठ एकत्र असलेले पहिले कॅम्पस नवी मुंबईमध्ये सुरू होत आहे," असेही त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, "यासोबत प्राइम फोकससोबत (Prime Focus) सामंजस्य करार करण्यात आला आहे, ज्याच्यामध्ये प्राइम फोकस एक फिल्मसिटी या ठिकाणी तयार करणार आहे, ज्यामध्ये जवळपास ३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून किमान १० हजार लोकांना रोजगार मिळेल. ‘एआय’ (AI) पॉवर आणि जगातली उत्तम तंत्रज्ञानही त्या ठिकाणी असणार आहे.पनवेल येथे चित्रपट सृष्टी उभारण्यासाठी गोदरेज सोबतही दोन हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीबाबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. एकूण ८ हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले आहे," अशी माहिती त्यांनी दिली.