सध्या तरी युद्धविराम, मात्र आगळिकीस कठोर प्रत्युत्तर मिळेल

19 May 2025 11:56:39

India-Pakistan Tensions don 
 
नवी दिल्ली : ( India-Pakistan Tensions ) “भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघन न करण्याच्या निर्णयानंतर आज हा युद्धविराम संपणार असून पुन्हा दोन्ही देशांत युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल,” अशा प्रकारच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू होत्या. याबाबत भारतीय लष्कराकडून सांगण्यात आले की, “दोन्ही देशांच्या ‘डीजीएमओं’ची कोणतीही नियोजित चर्चा होणार नाही. दि. १२ मे रोजी झालेल्या शेवटच्या चर्चेत युद्धबंदीचा नियम आणि त्याबद्दलच्या अटी-शर्थी ठरवण्यात आल्या होत्या. तीच भारत-पाकिस्तानच्या ‘डीजीएमओं’ची शेवटची चर्चा होती. त्यावेळी युद्धविरामाला कोणतीही मुदत ठरवण्यात आलेली नव्हती. युद्धविराम अनिश्चित काळासाठी सुरूच आहे. त्यामुळे ‘युद्धविराम संपणार’ या बातम्या पूर्णपणे चुकीच्या आहेत. अफवांकडे लक्ष देऊ नका,” असे आवाहनही भारतीय लष्कराकडून करण्यात आले आहे. भारत-पाकिस्तानमधील युद्धबंदी संपणार असल्याच्या बातम्या काही समाजमाध्यमांतून समोर येत आहेत. याबाबत भारतीय लष्कराने स्पष्टीकरण दिले आहे.
 
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारत-पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. पाकिस्तान सातत्याने भारतीय शहरांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले करत होता, ज्याला भारतीय सैन्यही चोख प्रत्युत्तर देत होते. दि. १० मे रोजी संध्याकाळी भारत आणि पाकिस्तानमध्ये ‘युद्धबंदी करारा’वर स्वाक्षरी झाली. त्यानंतर दि. १२ मे रोजी दोन्ही देशांच्या ‘डीजीएमओं’मध्ये बैठक झाली, ज्यामध्ये युद्धबंदीबाबत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले, तर भारत सरकारने “दहशतवादाविरुद्ध सुरू असलेल्या लढाईबाबत भविष्यात कोणतीही दहशतवादी घटना झाल्यास भारताविरुद्ध युद्धाची कृती मानली जाईल,” असा कडक संदेश दिला.
 
बातमी पूर्णपणे चुकीची
 
गेल्या काही दिवसांपासून काही मीडिया रिपोर्ट्समध्ये या बातमीची चर्चा होती की, दि. १८ मे रोजीपर्यंतच भारत-पाकिस्तान यांच्यात युद्धविराम आहे. पण आता सैन्याने या बातम्यांवर निवेदन जारी केले आहे. भारतीय सैन्याने स्पष्ट केले आहे की, दि. १८ मे रोजी ‘डायरेक्टर जनरल ऑफ मिलिट्री ऑपरेशन्स’ स्तरावरील कोणतीही वार्ता निश्चित नाही. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये अशी चर्चा होती की, दि. १८ मे रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शस्त्रसंधी समाप्त होईल. या बातमीनंतर अनेक लोकांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली होती. तथापि, सैन्याने आता स्पष्ट निवेदन जारी करून सांगितले आहे की, दोन्ही देशांमधील संघर्षविराम समाप्त होण्याची बातमी पूर्णपणे चुकीची आहे.
कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका
 
“दोन्ही देशांमध्ये रविवार, दि. १८ मे रोजी ‘डीजीएमओ’ स्तरावरील कोणतीही चर्चा होणार नाही,” असे लष्कराने स्पष्ट केले. “भारत आणि पाकिस्तानच्या ‘डीजीएमओं’मध्ये दि. १२ मे रोजी झालेल्या ‘युद्धबंदी करारा’ची कोणतीही अंतिम तारीख निश्चित केलेली नाही. म्हणजेच, दोन्ही देशांमधील हा युद्धविराम अनिश्चित काळासाठी सुरू राहील. युद्धविराम संपल्याच्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका,” असेदेखील लष्कराकडून सांगण्यात आले आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’चा नवा व्हिडिओ जारी
 
भारतीय लष्कराने पाकिस्तानविरुद्धच्या ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत एक नवीन व्हिडिओ जारी केला. ज्यामध्ये असे सांगण्यात आले होते की, दि. १० मे रोजी ज्या पाकिस्तानी चौक्यांमधून युद्धबंदीचे उल्लंघन करण्यात आले होते, त्या चौक्या प्रत्युत्तरात उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0