मुंबई : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी रविवार, १८ मे रोजी काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांच्याबाबत एक खळबळजनक दावा केला आहे. गौरव गोगोई यांना आयएसआय चे निमंत्रण असून या निमंत्रणावरूनच ते पाकिस्तानला गेल्याचे त्यांनी म्हटले आहे. सरमा यांच्या या दाव्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
गुवाहाटी येथील एका कार्यक्रमादरम्यान माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले की, "गौरव गोगोई यांचा पाकिस्तान दौरा पर्यटनासाठी नव्हता तर प्रशिक्षणासाठी होता. त्यांना पाकिस्तानच्या गृहमंत्रालयाकडून निमंत्रण मिळाले असून ते देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक आहे. गौरव गोगोई आयएसआयच्या निमंत्रणावरून पाकिस्तानला गेले होते. आमच्याकडे निमंत्रण पत्राशी संबंधित काही कागदपत्रे आहेत," असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, "आतापर्यंत मी कधीच इतके उघडपणे बोललो नव्हतो. पण आज पहिल्यांदाच स्पष्टपणे सांगत आहे की, गौरव गोगोई आयएसआयच्या निमंत्रणावरून पाकिस्तानला गेले होते. त्यांना तिथे प्रशिक्षण मिळाले. गौरव गोगोई यांना पाकिस्तानच्या गृहमंत्रालयाकडून एक पत्र मिळाले, त्यानंतरच ते पाकिस्तानला गेले. परदेशी विद्यापीठाकडून आमंत्रण मिळणे वेगळी गोष्ट आहे परंतू, यात त्यांना परदेशी सरकारच्या एका विभागाकडून आमंत्रित करण्यात आले होते. तेसुद्धा परराष्ट्र मंत्रालय किंवा सांस्कृतिक व्यवहार मंत्रालयाकडून नाही, तर त्यांना पाकिस्तान सरकारच्या सर्वात महत्त्वाच्या गृह मंत्रालयाकडून आमंत्रित करण्यात आले होते. त्यामुळे गौरव गोगोई यांचे हे पाऊल देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक आहे. ही एक अतिशय गंभीर बाब आहे असून यावर कारवाई केली जाईल," असेही सरमा यांनी सांगितले.
१० सप्टेंबरपर्यंत पुरावे सादर करणार!
यासोबतच आपल्याकडे यासंबंधीचे पुरावे असून १० सप्टेंबरपर्यंत ते जनतेसमोर सादर करणार असल्याचा दावाही हिमंता बिस्वा सरमा यांनी केला आहे. शिवाय यातील आपला एकही शब्द खोटा ठरला तर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.