मुंबई: ( Russia Ukraine war ) रशिया आणि युक्रेन युद्धाच्या तीन वर्षांच्या सततच्या संघर्षानंतर झालेल्या पहिल्या रशिया-युक्रेन बैठकीमध्ये शांततेच्या कोणत्याही मार्गावर एकमत झाले नाही. तुर्कीमध्ये झालेली रशिया आणि युक्रेनमधील पहिली थेट शांतता चर्चा शुक्रवार, दि. 16 मे रोजी दोन तासांपेक्षा कमी वेळातच आटोपती घेण्यात आली. मात्र, यापुढे चर्चा करण्याच्या आधी उभयतांनी प्रत्येकी एक हजार युद्धबंदी सोडण्याचे मान्य केले.
रशिया आणि युक्रेन युद्ध जवळपास गेली तीन वर्षे सुरू आहे. दोन्ही देशांमध्ये शांतता निर्माण करण्याच्या चर्चा अनेकदा झाल्या. मात्र, दोन्ही देश याबाबत प्रत्यक्ष चर्चेला बसले नाहीत. तुर्कीमध्ये आयोजित या शांतता बैठकीत तीन वर्षांनी दोन्ही देशांचे अधिकारी समोरासमोर आले. यावेळी दोन तास विविध मुद्द्यांवर चर्चादेखील झाली. मात्र, रशिया-युक्रेनमध्ये युद्धबंदी होईल, अशा कोणत्याही मार्गावर उभयपक्षांमध्ये एकमत झाले नाही. परिणामी, शांततेचा हा प्रयत्न फिस्कटल्याचे दिसून आले.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होल्दोमीर झेलेन्सकी या बैठकीला उपस्थित राहणार म्हणून जगाचे लक्ष या बैठकीकडे लागले होते. प्रत्यक्ष बैठकीच्या वेळी दोन्ही देशांच्या राष्ट्राध्यक्षांनी समोरासमोर बसून चर्चा करण्याचे टाळले. दोन्ही देशांच्या शिष्टमंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये पुढील चर्चेआधी दोन्ही देशांनी एक हजार युद्धबंदी सोडण्याचे मान्य केले. रशियाच्या अटी या मान्य होण्यासारख्या नसल्याचे काही युक्रेनच्या अधिकार्यांनी सांगितले.
तसेच बैठकीदरम्यान दोन्ही देशातील राष्ट्रप्रमुखांची उपस्थिती आणि सन्मानजनक युद्धबंदी यावर सखोल चर्चा दोन्ही पक्षांकडून करण्यात आली. दोन्ही देशांनी एकमेकांना युद्धबंदीचे सविस्तर प्रस्ताव आणि त्यांच्या राष्ट्रप्रमुखांनी एकमेकांना भेटण्याबाबत सहमती झाल्याचे रशियाच्या पंतप्रधानांचे साहाय्यक व्लादिमिर मेडिन्स्की यांनी म्हटले आहे. दरम्यान, झेलेन्क्सी यांनी निर्णय घेण्याची क्षमता नसलेले अधिकारी चर्चेला पाठवल्याबद्दल पुतीन यांच्यावर टीका केली आहे.
ट्रम्प यांचीही शांतिवार्तेकडे पाठ...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी “आजवर अनेकवेळा या दोन्ही देशांमध्ये समेट घडवण्यासाठी मध्यस्थी करण्यास तयार आहे,” असे सांगितले होते. तुर्कीमधील चर्चेतही सहभागी होण्यास ट्रम्प उत्सुक होते. त्यासाठी त्यांनी स्वतःच्या मध्य-पूर्वेतील नियोजित दौर्यात बदल करण्याचीही तयारी दर्शवली होती. मात्र, रशिया-युक्रेनचे राष्ट्रप्रमुखच गैरहजर असल्याने ट्रम्प यांनीही या बैठकीकडे पाठ फिरवली.
जर्मनीकडून रशियावर नव्या निर्बंधांची शक्यता
तुर्कीमधील बैठकीला अनुपस्थित राहिल्यामुळे जर्मनी रशियावर नवे निर्बंध लादण्याचा विचार करत आहे. 30 दिवसांच्या युद्धबंदीसाठी अनेक युरोपीय देशांचे नेते पुतीन यांच्यावर दबाव आणत असल्याचे चित्र दिसत आहे.