परेश ठाकूर यांच्याकडून सामाजिक कार्यासह क्रीडा क्षेत्राची उंची वाढविण्याचे काम - प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण

17 May 2025 18:32:17

Paresh thakur to work on raising the standards of sports

पनवेल : पनवेलमाजी सभागृहनेते परेश ठाकूर यांचे समाजातील प्रत्येक घटकाबरोबर चांगले नाते असून त्यांच्या पाठीशी युवा शक्ती आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री व भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी खारघर येथे केले. तसेच सामाजिक कार्यासह क्रीडा क्षेत्राची उंची वाढविण्याचेही काम त्यांनी केले असल्याचे अधोरेखित केले.


महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते व युवा पिढीचे प्रेरणास्थान परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चा खारघरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पनवेल फुटबॉल लीगला अर्थात स्थानिक फुटबॉल भव्य पर्वाला खारघरमध्ये शानदार सुरुवात झाली. या फुटबॉल लीगचे उदघाटन महाराष्ट्र प्रदेश भाजपचे कार्यकारी अध्यक्ष आणि राज्याचे माजी मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्यावेळी उदघाटक म्हणून मार्गदर्शन करताना बोलत होते.


यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, खारघर मंडल अध्यक्ष प्रवीण पाटील, माजी नगरसेवक अनिल भगत, हरेश केणी, गणेश कडू, पापा पटेल, अभिमन्यू पाटील, शत्रुघ्न काकडे, नरेश ठाकूर, गुरुनाथ गायकर, युवा नेते हॅप्पी सिंग, माजी नगरसेविका हर्षदा उपाध्याय, नेत्रा पाटील, जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, वासुदेव पाटील, समीर कदम, दीपक शिंदे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, प्रवीण बेरा, माजी सरपंच संजय घरत, महिला मोर्चाच्या अध्यक्षा साधना पवार, युवा मोर्चा खारघर अध्यक्ष नितेश पाटील, संतोष शर्मा, संध्या शारबिद्रे, अभिषेक भोपी, तेजस जाधव, अजिंक्य नवघरे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, क्रीडाप्रेमी मोठया संख्येने उपस्थित होते.


हि स्पर्धा खारघरमधील सेक्टर ७ येथील पंडित दीनदयाल उपाध्याय मैदानावर हि स्पर्धा होत असून या लीगमधील विजेत्या संघाला ५० हजार रुपये व चषक, द्वितीय क्रमांकाला २५ हजार व चषक आणि तृतीय क्रमांकास १० हजार रुपये व चषक असे मुख्य बक्षिसांचे स्वरूप आहे. परदेशात फुटबॉल प्रिमिअर लीग खेळली जाते, ती स्पर्धा लहान आयोजनातून उत्तरोत्तर मोठी झाली आणि या स्पर्धेचा जगभर नावलौकिक झाला. आपल्या देशात विशेषतः हा खेळ क्रिकेटप्रमाणे जास्त खेळला जात नाही. मात्र शारीरिक व्यायाम व तंदुरुस्तीच्या बाबतीत हा खेळ गणला जातो. या आयोजनाच्या प्रयत्नातून या खेळाची आवड तरुणाईमध्ये निर्माण होण्यासाठी पनवेल लीगच्या माध्यमातून प्रयत्न होत आहे. तरुणांना प्रोत्साहन देणारा आणि एकोपा निर्माण करणारा हा खेळ असल्याने या खेळाचाही प्रसार व प्रचार झाला पाहिजे आणि स्थानिक फुटबॉलपटूंना व्यासपीठ मिळाले पाहिजे या दृष्टिकोनातून या पनवेल फुटबॉल लीगचे आयोजन करण्यात आले असून या लीगमध्ये आठ निवडक संघ आपले कौशल्य सादर करत आहेत. खारघर किंग, तळोजा टायटन्स, कळंबोली वॉरिअर्स, कामोठे नाईट्स, पनवेल सिटी फुटबॉल क्लब, पनवेल पॅन्थर, न्यू पनवेल युनायटेड, खांदा कॉलनी स्ट्रायकर्स या आठ संघाचा आणि नामवंत खेळाडूंचा भरणा आहे. ही स्पर्धा केवळ खेळापुरती मर्यादित नाही तर तरुणांना खेळाकडे वळविणारा एक स्तुत्य उपक्रम ठरणार आहे. त्यामुळे पनवेल लीगच्या माध्यमातून माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त एक चांगला उपक्रम राबविण्यात आला आहे. यावेळी या आठ संघाच्या संघमालकांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी परेश ठाकूर यांच्या कार्याचा गौरव केला. ते पुढे म्हणाले कि, निरोगी शरीर सर्वात मोठी संपत्ती आहे. तरुणांनी व्यसनाधीन होऊ नये यासाठी स्वामी विवेकानंद यांनी मैदानी खेळाकडे वळण्याचा कायम आग्रह धरला. युवा शक्ती पुढे जाण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाज्वल राष्ट्रप्रेम आणि क्रीडा क्षेत्राला महत्व दिले. परेश ठाकूर आणि टीम सातत्याने विविध उपक्रमे राबवीत आहेत. त्या अनुषंगाने खेळाडू आणि खेळाला मानसन्मान देण्याचे काम केले जात आहे. या क्रीडानगरीचा देखावा राष्ट्रीय स्पर्धांप्रमाणे आहे. तरुणांना आकर्षित करणारा हा क्रीडा महोत्सव असून अशा दर्जेदार कार्यक्रमातून आणि सामाजिक सेवेतून परेश ठाकूर यांचे कार्य नेहमीच अधोरेखित झाले आहे, असे सांगतानाच परेश ठाकूर यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी दरवर्षी मी वाढदिवसाला येत असल्याचेही त्यांनी नमूद केले.


यावेळी आमदार विक्रांत पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले कि, पनवेल शहराचा विकास झाला पाहिजे हा दृष्टिकोन माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांचा कायम राहिला आहे. सभागृहनेते म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर सभागृहात काम केले तेव्हा त्यांचा विकासाचा दृष्टिकोन आम्ही जवळून बघितला आहे. एखादा विषय घेतला कि त्यावर विचार करून फक्त आदेश देऊन सोडायचे नाही तर विषय पूर्ण होईपर्यंत त्याच्यावरती सातत्याने पाठपुरावा करायचा पिंड परेश ठाकूर यांचा राहिला आहे. त्यामुळे अधिकारी वर्गाला माहिती आहे कि विषय मार्गी लागेपर्यंत परेश ठाकूर यांचा पाठपुरावा कायम असतो त्यामुळे पूर्णत्वास नेण्याची मानसिकता अधिकारी वर्गाची असते. त्यामुळे मन लावून काम करणारा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. पनवेलच्या पायाभूत सुविधांचा विकास करण्याचे काम परेश ठाकूर यांनी केले त्याचबरोबर युवा शक्तीला विविध सामाजिक उपक्रमातून पुढे आणण्याचे कामही त्यांनी यशस्वीपणे केले असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. तसेच शैक्षणिक, क्रीडा क्षेत्राचा दृष्टिकोनही त्यांचा उल्लेखही आमदार विक्रांत पाटील यांनी करत समाजसेवेचा वसा अखंड चालू राहण्यासाठी उदंड आयुष्य लाभो, अशा शब्दात शुभेच्छाही दिल्या.


यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी आपल्या भाषणात सांगितले कि, माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांचा वाढदिवस म्हणजे विविध सामाजिक उपक्रमाची पर्वणी असते. पनवेल महापालिकेचे नेतृत्व त्यांनी ज्या पद्धतीने केले आहे ते वाखाण्याजोगे आहे. आणि त्या अनुषंगाने त्यांनी महापालिका हद्दीत विकासाचा आलेख उंचावला. महापालिका हद्दीत विकासकामे करण्याबरोबरच समस्या सोडवण्याचे काम ते करत आले आहेत. फक्त अधिकाऱ्यांना सांगणेच नाही तर त्या विषयाचा शेवटपर्यंत पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावण्याचे काम ते करतात. केंद्र असो कि राज्य भाजपच्यावतीने दिले प्रत्येक कार्यक्रम युवा नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी होत असतो. त्यांच्या कामाची पद्धत हि उत्तम आणि सामाजिक तळमळ असणारी आहे त्यामुळे आगामी पनवेल महापालिकेचा महापौर म्हणून परेश ठाकूर यांना आम्हाला पहायचे आहे, असेही अविनाश कोळी यांनी यावेळी म्हंटले.


पनवेल महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांनी बोलताना सांगितले कि, पनवेल विधानसभा क्षेत्रात क्रीडा क्षेत्राला प्राधान्य देण्याचे काम होत आहे आणि त्यासाठी भारतीय जनता पार्टी रायगड आणि युवा मोर्चा सक्रियतेने काम करत आहे. विशेषत्वाने आमदार प्रशांत ठाकूर यांचे या विषयाकडे लक्ष असते ते नेहमी सामाजिक सोबत क्रीडा क्षेत्राला महत्व देत असतात. खेळ आणि खेळाडूंचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला जात आहे. मागीलवर्षी अशाचप्रकारे माझ्या वाढदिवसानिमित्त विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच नमो चषकचे सलग दोन वर्षे आयोजन करून नवोदित खेळाडूंना व्यासपीठ मिळवून देण्यात आले असून एक लाखाहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेऊन हि स्पर्धा उत्स्फूर्तपणे मोठ्या प्रमाणात यशस्वी केली होती. भाजपने जेव्हा जेव्हा अशी कार्यक्रम दिली ती यशस्वी करण्याचे काम केले असल्याचेही त्यांनी नमूद केले. शारीरिक आणि मानसिक समाधान मिळत असल्याने क्रीडा क्षेत्राकडे तरुणाई वळत आहे, असे सांगत माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांची क्रिकेट अकादमी पनवेलमध्ये सुरु झाली आहे, अशाच प्रकारे पनवेल महानगरपालिका हद्दीत विविध ठिकाणी क्रीडा संकुल आणि मैदान विकसित करण्याचे काम हाती घेण्यात येत असल्याचीही माहिती त्यांनी या स्पर्धेच्या निमित्ताने दिली. या सोहळ्याचे प्रास्ताविक युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांनी केले.



Powered By Sangraha 9.0