नवी दिल्ली : (Indian climber dies on Mount Everest) जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट सर करताना पश्चिम बंगालचे 45 वर्षीय गिर्यारोहक सुब्रत घोष यांचा मृत्यू झाला आहे. त्यांनी यशस्वीरित्या शिखर गाठल्यानंतर खाली उतरताना ही दुर्घटना घडली.
नेपाळच्या ‘स्नोई होरायझन ट्रेक्स अॅण्ड एक्सपिडिशन’चे व्यवस्थापकीय संचालक बोधराज भंडारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुब्रत घोष यांनी 8 हजार, 848 मीटर उंचीवर असलेल्या माऊंट एव्हरेस्टचे शिखर गाठले होते. मात्र, परतीच्या वाटेवर अत्यंत धोकादायक आणि प्राणघातक समजल्या जाणार्या हिलरी स्टेपजवळ ते अचानक कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला.
हिलरी स्टेप हे एव्हरेस्टच्या शिखराच्या अगदी काही मीटर खाली असलेले ठिकाण आहे. याला ‘डेथ झोन’ असेही म्हटले जाते. कारण येथे नैसर्गिक ऑक्सिजनचे प्रमाण अत्यंत कमी असते आणि अशा वातावरणात मानवाचे शरीर फार काळ तग धरू शकत नाही. रात्री 2 वाजता सुब्रत आणि त्यांचा मार्गदर्शक शिखरावर पोहोचले. मात्र, उतरत असतानाच सुब्रत यांची तब्येत बिघडली. त्यांनी पुढे कूच करण्यास नकार दिला आणि काही वेळातच हिलरी स्टेपवरून पडून त्यांचा मृत्यू झाला.