मुंबई : जनसामान्यांच्या समस्यांकडे तात्काळ लक्ष देत त्यांचे निवारण करण्याच्या उद्देशाने ‘म्हाडा’च्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे मुख्य अधिकारी रेवती गायकर यांच्या अध्यक्षतेखाली दुसर्या जनता दरबार दिनात एकूण २ तक्रार अर्जांवर सुनावणी घेण्यात येऊन सदर दोन्ही तक्रारींचे निवारण करण्यात आले.
वांद्रे (पूर्व) येथील म्हाडा मुख्यालयातील भारतरत्न गुलजारीलाल नंदा सभागृहात झालेल्या या लोकाभिमुख उपक्रमात, श्रीमती गायकर यांनी अर्जदारांच्या समस्यांचे त्वरित निवारण करत अर्जदारांच्या मागण्या व प्रलंबित कामे तत्परतेने सोडविण्याचे निर्देश संबंधित विभागाच्या अधिकार्यांना दिले. ‘म्हाडा’ मुख्यालयात नियमितपणे राबविण्यात येणाऱ्या लोकशाही दिनाच्या धर्तीवर, प्रत्येक महिन्याच्या पहिल्या मंगळवारी ‘जनता दरबार दिन’ आयोजनाचा निर्णय मंडळाने घेतला आहे.
दरम्यान, दि.१६ रोजी झालेल्या जनता दरबार दिनात, अर्जदाराच्या नावे सदनिका असतांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत उपलब्ध सदनिकेसाठी सोडतीत चुकून अर्ज केलेल्या अर्जदाराने सदनिका म्हाडाकडे स्वाधीन करताना जमा केलेल्या अनामत रकमेचा पूर्ण परतावा करण्यासाठी अर्ज केला होता. याबाबत खातरजमा करून सदर अनामत रकमेचा पूर्ण परतावा करण्याचे निर्देश गायकर यांनी संबंधित अधिकार्यांना दिले.
तसेच गोठेघर येथील गृहनिर्माण योजनेतील लाभार्थ्यांसाठी बससेवा सुरू करण्याबाबत अर्ज आला. सदर अर्जावर सुनावणी करताना गायकर यांनी नवी मुंबई महानगरपालिका व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांना यापूर्वी दिलेल्या पत्राबाबत स्मरण पत्र देऊन त्यात मागणी निर्धारण करण्याबाबत नमूद करण्याचे निर्देश संबंधित अधिकार्यांना दिले. गायकर यांनी सर्व अर्जदारांचे म्हणणे सहानुभूतीपूर्वक ऐकून घेऊन, संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ व योग्य कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.