
मुंबई : नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्स (एनसीपीए) तर्फे दरवर्षी आयोजित केला जाणारा प्रतिबिंब मराठी नाट्य उत्सव यंदा २२ मे (गुरुवार) ते २५ मे (रविवार) या कालावधीत पार पडणार आहे. मराठी रंगभूमीच्या समृद्ध परंपरेचा जागर करणारा हा उत्सव यंदा अधिक व्यापक आणि आशयघन स्वरूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. एनसीपीएने या महोत्सवाची संकल्पना तयार केली आहे ती स्थानिक रंगभूमीला प्रोत्साहन देण्यासाठी, नव्या लेखनाला चालना देण्यासाठी आणि मराठी नाट्यविश्वातील गुणी कलाकारांना एक भक्कम व्यासपीठ मिळवून देण्यासाठी. ‘प्रतिबिंब’ हा केवळ नाट्यप्रयोगांचा संच नसून, तो प्रेक्षकांना नाटकाच्या जगात अधिक खोलवर घेऊन जाण्याचा एक संवेदनशील प्रयत्न आहे.
या वर्षीच्या महोत्सवात सादर होणाऱ्या नाटकांमध्ये अलाइव्ह आणि असेन मी नसेन मी यांसारख्या समकालीन विषयांवर भाष्य करणाऱ्या सशक्त कथा आहेत. या कथा फक्त मनोरंजन देत नाहीत, तर सामाजिक विचारांना चालना देतात. यासोबतच मराठी रंगभूमीवर एक विशेष स्थान असलेले पुरुष हे नाटक नव्या रूपात पुन्हा रंगभूमीवर येणार आहे, जे एका पिढीला त्या ऐतिहासिक अनुभवाची नव्याने ओळख करून देईल. तसेच, ये जो पब्लिक है हे एक संवादात्मक आणि प्रायोगिक स्वरूपात सादर होणारे नाटक प्रेक्षकांच्या सहभागावर आधारित असून नाट्यप्रयोगाची चौकट मोडून वेगळा अनुभव देण्याचा प्रयत्न करतं.
सांगीतिक आणि काव्यात्मक कार्यक्रमांत तुझी औकात काय आहे? हे द्वैभाषिक संगीत नाटक भारताच्या विविध लोककला परंपरेला उजाळा देतं, तर सोबतीचा करार या कार्यक्रमात कविता आणि संगीतातून मैत्री, नातेसंबंध, आणि भावना यांचा प्रवास उलगडला जातो.उत्सवाचा एक विशेष भाग म्हणजे कार्यशाळा. ज्येष्ठ रंगकर्मी सचिन शिंदे आणि गीतांजली कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या वर्कशॉप्समध्ये नवोदित कलाकारांना प्रत्यक्ष शिकण्याची संधी मिळणार आहे. अभिनय, सादरीकरण, आणि रंगभूमीवरील तंत्र या बाबतीत विद्यार्थ्यांना आणि रसिकांना हे अनुभव खूपच मौल्यवान ठरणार आहेत.
एनसीपीएचे अधिकारी म्हणाले, “आम्ही विविध भाषा, शैली आणि कलाकारांना प्रोत्साहन देण्यावर भर देतो. ‘प्रतिबिंब’ हे मंच केवळ नाटकांचं नव्हे, तर अनुभवांचं, विचारांचं आणि अभिव्यक्तीचं दालन आहे. आम्हाला यंदा विशेष आनंद आहे कारण अलाईव्ह हे नाटक आमच्या 'दर्पण' या नव्या लेखन उपक्रमातून निवडण्यात आलं असून त्याचा यंदाचा प्रीमियर ‘प्रतिबिंब’मध्ये होणार आहे. हे मराठी नाट्यलेखनाच्या उज्वल भविष्याचं द्योतक आहे.”या सर्व नाटकांना इंग्रजी उपशीर्षकांची सुविधा देण्यात आलेली आहे, त्यामुळे मराठी न समजणाऱ्या प्रेक्षकांसाठीही ही कलाकृती समजून घेणं सुलभ होणार आहे.
‘प्रतिबिंब मराठी नाट्य उत्सव २०२५’ म्हणजे केवळ एक सांस्कृतिक महोत्सव नाही, तर मराठी नाट्यपरंपरेच्या आत्म्याला आणि अभिव्यक्तीच्या विविध पैलूंना साजेसा असा एक कलासंगम आहे. २२ ते २५ मे या चार दिवसांत मुंबईतल्या रसिक प्रेक्षकांना रंगभूमीचा एक नवा, ताजातवाना आणि सर्जनशील अनुभव घेता येणार आहे. हा उत्सव म्हणजे महाराष्ट्राच्या रंगभूमीला दिलेली एक अभिवादनपर भेटच म्हणावी लागेल.