आता ‘हेड कॉन्स्टेबल’ही तपास अधिकारी

16 May 2025 11:20:27

maharashtra police head constable is investigating officer 
 
मुंबई: ( maharashtra police head constable is  investigating officer ) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुन्हेमुक्त महाराष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून हेड कॉन्स्टेबल्सनाही (साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक) गुन्ह्यांचा तपास करण्याचे अधिकार दिले आहेत. यापूर्वी, केवळ पोलीस उपनिरीक्षकपदापासून वरिष्ठ अधिकार्‍यांकडे हा अधिकार होता.
 
याबाबतचे राजपत्र नुकतेच प्रकाशित करण्यात आले. त्यानुसार, पोलीस हेड कॉन्स्टेबल यांना गुन्ह्याचा तपास करण्याचा अधिकार देण्यात आला आहे. त्यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत. संबंधित पोलीस हेड कॉन्स्टेबल हा पदवीधर असावा, त्याने सात वर्षे सेवा पूर्ण केलेली असावी. त्यासोबतच, गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालय (नाशिक) येथील सहा आठवड्यांचे विशेष प्रशिक्षण पूर्ण आणि परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे असणार आहे. त्याच्याविरुद्ध कोणतीही विभागीय चौकशी प्रलंबित नसावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
 
पोलीस दलात उच्चशिक्षित तरुण भरती झाल्याने त्यांच्या अनुभवाची दखल घेऊन त्यांच्याकडे छोट्या गुन्ह्यांचा तपास देण्याचा निर्णय गृहविभागाने घेतला आहे. ज्यामुळे अधिकार्‍यांवरील ताण काही प्रमाणात कमी होईल आणि गुन्हे उकलीचा आलेखही वाढेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0