मुंबई : ज्यांनी मदत केली त्यांनी बोलले तर त्याला आगळेवेगळे महत्व आहे. पण तुम्ही ही दलाली कशाला करता? असा सवाल मंत्री संजय शिरसाट यांनी संजय राऊतांना केला आहे. संजय राऊतांच्या 'नरकातला स्वर्ग' या पुस्तकामुळे सध्या राजकारण तापले आहे. यावरूनच आता शिरसाटांनी राऊतांना हा सवाल केला.
मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, "शिवसेना वाढायला मुंबईत कोण कारणीभूत होते. हे कधीही कुणी सांगितलं नाही. शरद पवार कुणाशी बोलले? पवारांनी विरोध का केला? नरेंद्र मोदींना का वाचवलं? या गोष्टी शरद पवार साहेब बोलले तर त्याला महत्त्व आहे. ज्यांनी मदत केली त्यांनी हे सगळे बोलले तर त्याला आगळेवेगळे महत्व आहे. पण तुम्ही ही दलाली कशाला करता? तुम्हाला हे सर्व कुणी सांगितलं? जर त्यांचं ऐकून तुम्ही हे करत असाल तर त्यांच्या तोंडून येऊ द्या," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "नाते जपणे हा वेगळा भाग आहे. पण या शिवसेनाप्रमुखांनी कधीही राजकारणासाठी नात्याचा वापर केला नाही. शरद पवार साहेब शंभर वेळा मातोश्रीला जायचे. त्यांच्या गप्पा व्हायच्या हे शिवसेनाप्रमुख सांगायचे. त्यामुळे त्यांच्यानंतर आता अशा प्रकारे शिवसेनाप्रमुखांचा उल्लेख करणे गैर आहे," असेही मंत्री संजय शिरसाट म्हणाले.