
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून दहशतवाद्यांना पोसणार्या पाकिस्तानला ‘सळो की पळो’ करून सोडले. ‘भारत को कोई झुका नहीं सकता, हम ना झुकेंगे, ना रुकेंगे, ना बिकेंगे, ना थकेंगे,’ हे यानिमित्ताने आपण संपूर्ण जगाला ठणकावून सांगितले. भारतीय सैन्यदलांनी आपल्या दुर्दम्य ताकदीचाही परिचय करून दिला. त्यामुळे भारतमातेच्या रक्षणासाठी जीवाची बाजी लावणार्या शूर जवानांच्या शौर्याला अभिवादन करण्यासाठी काल भाजपकडून देशभरात तिरंगा रॅली काढण्यात आली. मात्र, या उपक्रमाचे कौतुक करायचे सोडून, काहींना पोटदुखी सुरू झाली. उबाठा गटाचे खा. संजय राऊत त्यापैकीच एक. ते म्हणाले, “तिरंगा यात्रा काढण्याचे कारण काय? कसले श्रेय? शस्त्रसंधीचे आणि माघारीचे श्रेय का? युद्धविराम, माघार, शस्त्रसंधी हाच विजय मानून एक पक्ष एका देशामध्ये विजय सोहळा साजरा करतो. दुसर्यांच्या हस्तक्षेपाने युद्धविराम, विजय कसा असू शकतो?,” असा उफराटा सवाल त्यांनी उपस्थित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कणखर नेतृत्वाखाली केलेल्या या कारवाईचे केवळ भारत नव्हे, तर अनेक राष्ट्रांकडून कौतुक होत असताना राऊतांसारख्या बोलघेवड्याने अशी विधाने करणे, अगदीच हास्यास्पद. आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी हुतात्मांच्या बलिदानाला निरर्थक ठरवण्याचा हा प्रकार कोणताही भारतवासी सहन करणार नाही. पाकड्यांचा हल्ला परतवून लावताना या जवानांनी छातीचा कोट करून हौतात्म्य पत्करले. ऐन तारुण्यात विधवा झालेली त्यांची पत्नी, पोरकी झालेली मुले, आसराहीन झालेल्या आई-वडिलांचे अश्रू संजय राऊत वा त्यांच्या पक्षप्रमुखांना दिसले नाहीत. नको तिथे राजकारण आणण्याच्या यांच्या सवयीमुळेच पक्षाची ही दशा झाली, हे त्यांनी विसरू नये.
राऊतांच्या उपर ते काँग्रेसचे जयराम रमेश! ‘ऑपरेशन सिंदूर’ ही कोणत्याही एका पक्षाची मक्तेदारी नाही, असा दावा त्यांनी केला. म्हणजे ही मोहीम यशस्वी झाल्याचे ते मान्य करतात. पण, त्याचे श्रेय मोदी किंवा भाजपला मिळू नये, असा त्यांचा प्रयत्न. 26/11 किंवा अन्य दहशतवादी हल्ल्यानंतर तत्कालीन काँग्रेस सरकारने जशास तसे उत्तर पाकिस्तानला दिले असते, तर ते याबाबत अधिकारवाणीने कदाचित बोलूही शकले असते. पण, त्यांनी तो अधिकार केव्हाच गमावलाय!
आगाऊ शुभेच्छा
घरचे झाले थोडे आणि व्याह्याने धाडले घोडे’ अशी उबाठा गटाची सध्याची गत. कालपरवापर्यंत ज्या ‘मातोश्री’चा शब्द शिवसैनिकांसाठी प्रमाण होता, त्या शब्दाला उद्धव ठाकरेंच्या दरबारात तितकेसे वजन उरलेले आता दिसत नाही. म्हणूनच तेजस्वी घोसाळकर यांच्यासारख्या नवख्या माजी नगरसेविकेने ठाकरेंना आव्हान देण्याची भाषा केली. तेजस्वी यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यांना तातडीने भेटायला येण्याचे फर्मान सोडले. मात्र, त्यांनी साफ नकार दिला. त्यानंतर सासरे विनोद घोसाळकर यांनी मध्यस्थी केली आणि दुसर्या दिवशी ते सुनेला घेऊन ‘मातोश्री’वर गेले. बरे, एकदा उद्धव ठाकरेंना भेटलेला नेता वा कार्यकर्ता नाराजी पोटात घालून पुन्हा जोमाने कामाला लागतो. घोसाळकर यांच्याबाबतीत तसे घडले नाही. ‘काही प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत, ती मिळाली की पुढचा निर्णय घेईन,’ अशी बोलकी प्रतिक्रिया तेजस्वी यांनी ‘मातोश्री’च्या अंगणातून दिली.
आजपर्यंत असे धाडस कोणी केले नव्हते. पण, उद्धव ठाकरेंसोबत राहून करिअर होऊ शकत नाही, याचा अंदाज आल्यामुळेच बहुधा त्यांनी उघडपणे भावना व्यक्त केल्या. बरे, त्या बोलल्या म्हणून लक्षात राहिल्या, पण न बोलून कितीजणांनी उद्धवरावांची साथ सोडली, याचा आकडा पाहिल्यास आश्चर्यचकित व्हायला होईल. 2017 सालच्या मुंबई पालिका निवडणुकीत निवडून आलेले 84 आणि मनसेतून फोडलेले आठ, असे 92 नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या दिमतीला होते. त्यातील जवळपास 53 जणांनी महायुतीचा पर्याय निवडला. तेजस्वी घोसाळकर यांनी तूर्तास उद्धव ठाकरेंना सोडण्याचा विचार नसल्याचे जाहीर केले असले, तरी त्या किती दिवस सोबत राहतील, हे उबाठामधील एकही नेता खात्रीने सांगू शकत नाही. बरे, तेजस्वी यांच्या सगळ्या अटी मान्य करून त्यांना थांबवालही. पण, बाकीचे 20-22 गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत, त्यांचे काय कराल? आता देवाचा कितीही धावा केला, तरी ही गळती रोखणे जवळपास अशक्य! त्यामुळे पुढील चार महिन्यांत होणार्या पालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंना आगाऊ शुभेच्छा!