छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मस्थळाचे संवर्धन करणार : मंत्री ॲड. आशिष शेलार

15 May 2025 11:34:27
 
Ashish Shelar
 
पुणे : पुरंदर किल्ल्यावरील छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झालेल्या वाड्यांच्या भिंतीची पुनर्बांधणी, संवर्धन आणि जतन करण्यासाठी लष्कराशी चर्चा करून प्रयत्न करणार असल्याची ग्वाही सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी बुधवार, १४ मे रोजी दिली.
 
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त किल्ले पुरंदर येथे त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन त्यांनी अभिवादन केले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार विजय शिवतारे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल (निवृत्त) स. दै. हंगे, पुरातत्व विभागाचे सहायक संचालक डॉ. विलास वाहणे, तहसीलदार विक्रम राजपूत, गटविकास अधिकारी पंकज शेळके, पुरंदर प्रतिष्ठानचे प्रशांत पाटणे आदी उपस्थित होते.
 
मंत्री ॲड. आशिष शेलार म्हणाले की, "छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव आणि पराक्रम महाराष्ट्रासोबतच संपूर्ण भारताला परिचयाचा आहे. ते प्रचंड पराक्रमी, बुद्धिमान आणि संवेदनशील होते. बालपणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत मोहिमा, लढाया, स्वाऱ्यांवर गेल्यामुळे त्यांना पराक्रमाचे बाळकडू मिळाले. त्यांच्या शौर्यात प्रचंड ताकद असल्यामुळे त्यांनी बलाढ्य आणि क्रूर अशा औरंगजेबाशी लढताना ९ वर्षे त्याला सळो की पळो केले. छत्रपती संभाजी महाराज हे बुद्धिमान, संस्कृतचे गाढे अभ्यासक होते. त्यांनी संस्कृतमध्ये लिखाण केले. त्यांना इंग्रजीचे ज्ञान होते आणि हिंदीमध्येही त्यांनी ग्रंथरचना केली. धर्मरक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी रयतेवर वात्सल्य, प्रेम केले. त्याच मार्गावर राज्य शासन वाटचाल करत आहे," असे त्यांनी सांगितले.
 
 
Powered By Sangraha 9.0