तीन अतरंगी मित्रांची भन्नाट कहाणी,‘आंबट शौकीन’ चित्रपटाचा धमाल टीझर प्रदर्शित!

14 May 2025 11:42:57

the amazing teaser of the film ambat shaukeen a fantastic story of three eccentric friends is out
 
 
मुंबई : काही दिवसांपूर्वीच धमाल आणि जबरदस्त किस्से यांचा मनसोक्त डोस घेऊन येणाऱ्या 'आंबट शौकीन' चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित झाले. आता या चित्रपटाचा भन्नाट टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांच्या उत्सुकतेला अधिकच उधाण आले आहे. टीझरमधूनच धमाल कॉमेडी, जबरदस्त पंचेस आणि रंगतदार दृश्यांची झलक पाहायला मिळत असून हा चित्रपट एका धमाकेदार प्रवासाची सुरुवात आहे, असे म्हणायला हरकत नाही. तीन अवलिया मित्रांची कहाणी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या खट्याळ, अतरंगी मित्रांची मुली पटवण्यासाठी चाललेली धडपड या चित्रपटात पाहायला मिळेल.
 
 
हेक्सव्हिजन एंटरटेनमेंट, एसएस अँड केएल ब्रदर्स प्रॉडक्शन्स, लॅब्रोस एंटरटेनमेंट आणि बिग ब्रेन प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘आंबट शौकीन’ या चित्रपटाचं दिग्दर्शन निखिल वैरागर यांनी केले असून अक्षय टंकसाळे, निखिल वैरागर व किरण गायकवाड यांच्या प्रमुख भूमिका असून तसेच प्रार्थना बेहेरे, भाऊ कदम, पार्थ भालेराव, अभिजीत खांडकेकर, मोनालिसा बागल, अमेय वाघ, चिन्मय संत, राहुल मगदूम, श्रीकांत यादव, आशय कुलकर्णी, शुभंकर एकबोटे, गौतमी पाटील, रमेश परदेशी, मानिनी दुर्गे, देवेंद्र गायकवाड, आकाश जाधव, आर्यक पाठक, विनोद खेडेकर, चेतन रायकर असे मराठी चित्रपटसृष्टीतील काही दमदार कलाकारांची भलीमोठी फौजही पाहायला मिळणार आहे.
 
 
दिग्दर्शक निखिल वैरागर म्हणतात, ''आंबट शौकीन या चित्रपटाच्या माध्यमातून एक वेगळा विषय प्रेक्षकांसमोर हलक्याफुलक्या, मजेशीर पद्धतीने मांडत आहे. सोशल मीडियाच्या दुनियेत हरवलेले आणि प्रेमात यश मिळवण्यासाठी धडपडणारे तीन मित्र ही कल्पना प्रेक्षकांचे नक्कीच खूप मनोरंजन करेल, याची मला खात्री आहे. तसेच उत्तम कलाकारांच्या अभिनयाने चित्रपट अजूनच कमाल बनला आहे.''


 
 
'आंबट शौकीन' या चित्रपटाची कथा निखिल वैरागर यांची असून प्रफुल्ल काकाणी, रंजना मोहित लखोटिया, अनघ भुतडा व निलेश राठी निर्माते आहेत. चित्रपटाची पटकथा आणि संवाद अक्षय टंकसाळे व अमित बेंद्रे यांचे आहेत. येत्या १३ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
Powered By Sangraha 9.0