पल्लवी जोशी 'तन्वी द ग्रेट' सह कान्स चित्रपट महोत्सवात पदार्पण करणार, ''अभिमान वाटतो, हे क्षण मी आयुष्यभर जपेन!"

14 May 2025 18:38:55

pallavi Joshi to make her cannes film festival debut with tanvi the great
 
मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीतील दमदार आणि अभ्यासू अभिनेत्री पल्लवी जोशी यांनी आपल्या अभिनयाने अनेकवर्षे रसिकांची मनं जिंकली आहेत. तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार पटकावलेल्या या अभिनेत्रीने आता आणखी एक मानाचा टप्पा गाठला आहे. २०२५ सालच्या कान्स चित्रपट महोत्सवात 'तन्वी द ग्रेट' या चित्रपटाच्या माध्यमातून त्या आपल्या आंतरराष्ट्रीय प्रवासाला सुरुवात करत आहेत. पल्लवी जोशी यंदा प्रथमच कान्सच्या रेड कार्पेटवर झळकणार आहेत. ‘द ताश्कंद फाइल्स’ आणि ‘द काश्मीर फाइल्स’सारख्या गंभीर आशयाच्या चित्रपटांतून प्रभावी भूमिका साकारणाऱ्या पल्लवी यांचं हे आंतरराष्ट्रीय पदार्पण त्यांच्या सर्जनशील प्रवासातील सुवर्णक्षण ठरत आहे.
 
 
 
या खास प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना पल्लवी म्हणाल्या, 'तन्वी द ग्रेट' हा चित्रपट कान्ससारख्या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवात सादर करणं ही खूप मोठी जबाबदारी आणि सन्मान आहे. अनूपम खेर यांच्यासह या सुंदर प्रवासाचा भाग असणं, आणि ही कलाकृती जगभरातील प्रेक्षकांसमोर मांडण्याची संधी मिळणं, हे माझ्यासाठी फारच भावनिक आणि खास आहे. ही कथा लोकांपर्यंत पोहोचावी, मनाला भिडावी, हीच इच्छा आहे.” दरम्यान, अनूपम खेर हे सुद्धा यंदा फ्रान्समध्ये दाखल झाले असून, ते स्वतः 'तन्वी द ग्रेट' चे दिग्दर्शन करत आहेत. हा त्यांचा दिग्दर्शकीय पदार्पण करणारा चित्रपट असून, याचे जागतिक प्रीमियर मार्चे डु फिल्म या विभागात होणार आहे.
 
 
 
मार्चे डु फिल्म हा कान्स चित्रपट महोत्सवाचा अधिकृत फिल्म मार्केट विभाग असून, येथे जगभरातील निर्माते, वितरक आणि चित्रपट रसिक एकत्र येतात. 'तन्वी द ग्रेट' ची या विभागात निवड होणे हेच चित्रपटाच्या दर्जाचे आणि आशयाचे मोठे प्रमाणपत्र मानले जात आहे. चित्रपटाच्या टीमसह पल्लवी जोशी आणि अनूपम खेर कान्समध्ये या विशेष स्क्रीनिंगला उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील अनेक मोठे निर्माते आणि कलाकार चित्रपट पाहण्यासाठी उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
 
 
चित्रपटाबाबत अद्याप फारशी माहिती समोर आलेली नसली तरी त्याभोवती निर्माण झालेली उत्सुकता लक्षवेधी आहे.'तन्वी द ग्रेट' ही एक भावनिक कथा असून ती सर्व वयोगटांतील आणि भौगोलिक सीमारेषांपलीकडील प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास दिग्दर्शक अनूपम खेर यांनी व्यक्त केला आहे. ते म्हणाले, “मी कायम असं काहीतरी बनवायचं स्वप्न पाहिलं होतं, जे सीमारेषा पार करेल आणि प्रत्येकाच्या हृदयाशी भिडेल. 'तन्वी द ग्रेट' हा चित्रपट आमच्या मनातून, आमच्या आत्म्यांतून जन्मलेला आहे. ही कथा अहमदाबादपासून ते अमेरिका पर्यंत – सर्वत्र लोकांच्या मनात स्थान मिळवेल, अशी माझी आशा आहे.”
 
 
 
कान्स चित्रपट महोत्सव १३ ते २४ मे २०२५ दरम्यान फ्रेंच रिव्हिएरामध्ये पार पडणार आहे. त्यानंतर 'तन्वी द ग्रेट' चे स्क्रीनिंग लंडन, न्यू यॉर्क आणि लॉस एंजेलिससारख्या प्रमुख शहरांमध्येही होणार असून, त्याच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाची मोठी योजना आखण्यात आली आहे. पल्लवी जोशी आणि अनूपम खेर यांच्यासाठी हा एक ऐतिहासिक क्षण ठरत असून, भारतीय चित्रपटसृष्टीसाठी देखील ही एक अभिमानास्पद गोष्ट आहे.



Powered By Sangraha 9.0