कल्याण: (Nandu Parab on BJP KDMC mayor ) भाजपा प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरविणार असून कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपाच महापौर बसविणार असा विश्वास नवनिर्वाचित कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी व्यक्त केला.
भाजपाने महाराष्ट्र प्रदेशातील संघटनात्मक जिल्ह्याकरिता जिल्हाध्यक्ष पदांची मंगळवारी घोषणा केली. यामध्ये परब यांच्या गळ्यात कल्याण जिल्हाध्यक्षपदाची माळ घालण्यात आली आहे. त्यांना पक्षाच्या पुढील वाटचालीबाबत विचारणा केली असता त्यांनी यावेळी हा विश्वास व्यक्त केला. परब यांनी सांगितले, पक्षाने जी संघटनात्मक जबाबदारी दिली आहे. त्यासाठी संघटना कशी वाढेल यासाठी प्रयत्न करणार आहे. कडोंमपात भाजपाचा महापौर बसावा अशी माझी ही इच्छा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नगरसेवक कसे निवडून येतील यासाठी प्रयत्नशील असणार आहे.
पक्षाने जिल्हाध्यक्ष पद दिले आहे. त्यामुळे खूप आनंद झाला आहे. भाजपा हा कार्यकत्यांना न्याय देणारा पक्ष आहे. एखादी व्यक्ती किती काम करते. पक्षाला किती वेळ देते हे पाहून त्या व्यक्तीला पद दिले जाते. रविंद्र चव्हाण हे प्रोटोकॉल पाळणारे आहेत. हे कमळ चिन्ह आमची ओळख आहे. चव्हाण साहेब आम्हाला लाभलेला हिरा आहे. ते स्वतः सुद्धा पक्ष वाढीसाठी फिरतात, असे ही त्यांनी सांगितले.
कार्यकर्ता ते जिल्हाध्यक्ष प्रवास
२००७ मध्ये भाजपात एक सदस्य म्हणून कामाला सुरुवात केली. त्यानंतर २००७ मध्ये रविंद्र चव्हाण यांनी पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी त्यांना उमेदवारी दिली. आजदे पंचायत समितीतून ते निवडून आले. तिथून त्यांचा खऱ्या अर्थाने राजकीय प्रवास सुरू झाला. त्यानंतर दोनदा मंडल अध्यक्ष, दोनदा जिल्हा सरचिटणीस, दोनदा कल्याण ग्रामीण विधानसभा संयोजक , जिल्हा सरचिटणीस, कल्याण जिल्हा सदस्य नोंदणी संयोजक म्हणून काम केले आहे. आणि आता जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
कल्याण ग्रामीण मंडळ कार्यालयात उत्साहाचे वातावरण
कल्याण जिल्हाध्यक्ष पदी नंदू परब यांची नियुक्ती होताच कल्याण ग्रामीण मंडळ कार्यालयात उत्साहाचे वातावरण दिसून आले. नंदू परब समर्थकांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती. तसेच त्यांचे अभिनंदन करणारे बॅनर ही शहरात झळकले.