मुंबई : सर जे. जे. रुग्णालयाच्या सुपरस्पेशालिटी इमारतीचे काम गतीने पूर्ण करा, असे निर्देश राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी मंगळवार, १३ मे रोजी दिले. सर जे.जे. वैद्यकीय महाविद्यालय येथे भेट देऊन त्यांनी रुग्णालयाची पाहणी केली आणि त्यानंतर आढावा बैठक घेतली.
यावेळी सचिव धीरज कुमार, आयुक्त राजीव निवतकर, संचालक डॉ. अजय चांदनवाले, अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार, अधीक्षक डॉ. संजय सुरासे यांच्यासह इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या की, "सर जे.जे रूग्णालयाच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालय बनविण्याच्या कामाला गती द्यावी. यामुळे अनेक वैद्यकीय सुविधा एकाच ठिकाणी मिळणार असून गरजू रूग्णांना याचा लाभ घेता येणार आहे. ऑक्टोबरपर्यंत काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने कामकाज करा," असे निर्देश त्यांनी दिले.
हे वाचलंत का? - भारतीय सैनादलाच्या शौर्याला पाठींबा देण्यासाठी ठाण्यात भव्य तिरंगा रॅली!
याप्रसंगी कार्डीओ, मज्जातंतू शल्यचिकित्सा, जनरल सर्जरी, अतिदक्षता विभाग, नर्सिंग होम आदी विभागांची त्यांनी पाहणी केली. या विभागांमध्ये रुग्णांसाठी वापरण्यात येणाऱ्या आधुनिक उपकरणांची माहिती घेत रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचे निवारण, रिक्त पदांची भरती तसेच डॉक्टर्ससाठी हॉस्टेल सुविधा याबाबत त्यांनी आढावा घेतला. यासोबतच रुग्णालयातील अन्न गुणवत्तेची पडताळणी, स्कॅनिंग सुविधा, ऑपरेशन थिएटर आणि शस्त्रक्रियेसाठी आवश्यक साहित्याच्या उपलब्धतेबाबतही संबंधित अधिकाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली. सर जे. जे. रुग्णालय रुग्णालयाच्या विकासासाठी सुरु असलेले सुपरस्पेशालिटी प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी यावेळी दिले.