राज्यपालांच्या हस्ते कामगार भूषण आणि विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कारांचे वितरण

14 May 2025 14:10:04
 
Kamgar Bhushan and Vishwakarma Qualified Worker Awards
 
मुंबई:( Kamgar Bhushan and Vishwakarma Qualified Worker Awards ) कामगारांच्या मेहनतीमुळेच महाराष्ट्राचा विकास शक्य झाला आहे. ‘विकसित महाराष्ट्र २०४७’ च्या दिशेने वाटचाल करीत असताना आणि एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचा ध्यास घेतलेला असताना या स्वप्नपूर्तीत कामगारांचा वाटा केवळ गरजेचा नाही तर अनिवार्य आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी केले.
 
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने हुतात्मा बाबू गेनू स्टेडियम, कामगार क्रीडा भवन, प्रभादेवी येथे आयोजित कार्यक्रमात ३६ व्या कामगार भूषण पुरस्कार व विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कारांचे वितरण राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते करण्यात आले.
 
कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर, कामगार राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार मनिषा कायंदे, मनोज जामसुदकर, कामगार विभागाच्या प्रधान सचिव आय.ए.कुंदन, राज्यपालांचे सचिव डॉ.प्रशांत नारनवरे, कामगार आयुक्त डॉ.एच.पी.तुम्मोड, संचालक रोशनी कदम, कल्याण आयुक्त रविराज इळवे तसेच कामगार आणि त्यांचे कुटुंबिय आदी उपस्थित होते. राज्यपालांनी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या विविध उपक्रमांचे यावेळी कौतुक केले. आरोग्य, शिक्षण, कौशल्य प्रशिक्षण, क्रीडा व मनोरंजनाच्या क्षेत्रात मंडळाने उचललेली पावले उल्लेखनीय आहेत. मुंबईत तयार केलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडासुविधा इतर जिल्ह्यांतही उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, असे ते म्हणाले.
 
महिलांसाठी चालविण्यात येणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमांचा त्यांनी विशेष उल्लेख केला. शिलाई, हस्तकला अशा कौशल्यांद्वारे कुटुंबांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवले जात आहे, असे सांगत राज्यपालांनी महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाशी भागीदारी करून नव्या प्रशिक्षण कार्यक्रमांची रचना करण्याचे आवाहन केले. राज्यपाल म्हणाले, कामगार, युनियन आणि उद्योजक यांच्यात सामंजस्य, संवाद व शांततापूर्ण वातावरण निर्माण करण्यासाठी कामगार विभागाने पुढाकार घेत राहणे आवश्यक आहे. येथील जनतेची एकजूट आणि निर्धार ही महाराष्ट्राची खरी ताकद असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
 
 
कामगारांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडविण्यास शासन कटिबद्ध – ॲड.आकाश फुंडकर, कामगार मंत्री 
 
राज्यातील कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन विविध योजना राबवत असून, कामगारांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्यासाठी पुरस्कार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा आणि संघटनात्मक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या कामगारांना पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याची दखल घेणे व त्यांना प्रोत्साहन देणे, हा पुरस्कारमालिकेचा उद्देश असल्याचे प्रतिपादन कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी यावेळी केले.
 
 
मंत्री फुंडकर म्हणाले की, राज्यभरातून निवडलेल्या ५१ गुणवंत कामगारांना या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले असून, २०२३ चा ‘कामगार भूषण’ पुरस्कार बजाज ऑटो लिमिटेड, वाळूज (छत्रपती संभाजीनगर) येथील श्रीनिवास कोंडीबा कळमकर यांना प्रदान करण्यात येत आहे. कामगार चळवळीतील योगदानाबाबत बोलताना मंत्री फुंडकर यांनी नारायण मेघाजी लोखंडे यांच्या कार्याचा गौरव केला. भारतातील पहिली संघटित कामगार संघटना स्थापन करून त्यांनी कामगार चळवळीचा पाया घातल्याचे ते म्हणाले.
 
कामगार कल्याणासाठी राज्य शासनाकडून राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती देताना ते म्हणाले की, कामगारांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती, परदेश शिक्षणासाठी योजना, क्रीडा स्पर्धा, नाट्य स्पर्धा, तसेच कौशल्य प्रशिक्षण व उद्योगांसोबत भागीदारीतून रोजगार संधी निर्माण करण्यावर शासन भर देत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील तरुणांना कौशल्य विकासाच्या माध्यमातून मोठ्या कंपन्यांमध्ये संधी मिळावी, यासाठी आयटीआयमधून प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे.
 
आज राज्यात केवळ १० टक्के संघटित तर ९० टक्के असंघटित कामगार आहेत. या असंघटित कामगारांच्या हितासाठी स्वतंत्र आयुक्तालय तसेच विविध मंडळे कार्यरत आहेत, असे सांगून त्यांनी कामगारांनी शासनाच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन केले. कामाबरोबरच स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी वेळ द्यावा, असे आवाहन त्यांनी कामगारांना केले.
 
असंघटित कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा योजनांचा विस्तार - ॲड.आशिष जवस्वाल, राज्यमंत्री
 
महाराष्ट्र सरकार कामगारांच्या कल्याणासाठी सातत्याने कार्यरत असून, आजवर अनेक धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. विशेषतः असंघटित कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा योजनांचा विस्तार करण्यात येत आहे. आज राज्यातील सुमारे १,७२,००० कामगार मंडळात नोंदणीकृत असून, ६५ लाख रुपयांचा वार्षिक निधी संकलित होतो. या निधीचा उपयोग विविध क्रीडा, सामाजिक आणि आर्थिक कल्याणकारी योजनांकरिता केला जात असल्याचे कामगार राज्यमंत्री ॲड. जयस्वाल यांनी सांगितले.
 
अधिकाधिक कामगारांना मंडळात सहभागी करून त्यांना आर्थिक आणि सामाजिक लाभ मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असून कामगारांचे जीवनमान उंचावणे आणि संकटग्रस्त कुटुंबांना आधार देण्यास शासनाचे प्राधान्य असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
 
यावेळी बजाज ऑटो लिमिटेड मधील मल्टिस्किल ऑपरेटर श्रीनिवास कोंडिबा कळमकर यांना २०२३ चा कामगार भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्याचबरोबर ५१ कामगारांना विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार देण्यात आले. कामगारांच्या गुणवंत पाल्यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला.
 
 
Powered By Sangraha 9.0