मुंबई : भारतीय सैनादलाच्या शौर्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी बुधवार, १४ मे रोजी शिवसेनेच्या वतीने ठाणे येथे भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली आयोजित करण्यात आली.
पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याला भारतीय ऑपरेशन सिंदूरद्वारे कठोर प्रत्युत्तर देणाऱ्या भारतीय सैनादलाच्या शौर्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी ठाण्यात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, शिवसेना सचिव राम रेपाळे, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी नगरसेवक मनोज शिंदे, ठाणे विधानसभा प्रमुख हेमंत पवार, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक आणि ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे वाचलंत का? - राज ठाकरे हे मुक्त विद्यापीठ! कुणीही जाऊन...; संजय राऊतांचं विधान
ठाणे शहरातील कोर्टनाका परिसरातील शहीद स्तंभाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून ‘वंदे मातरम’, ‘भारत माता की जय’, ‘जय जवान जय किसान’ अशा घोषणा देत तिन्ही सैन्यदलांचा जयजयकार करत ही रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये असंख्य शिवसैनिक आणि ठाणेकरांनी सहभाग घेतला. भारतीय सैन्य दलाने दाखवलेला त्याग, बलिदान आणि धाडसाचे त्यांनी कौतुक केले. तसेच प्रत्येक भारतीय नागरिक हा सैन्य दलाच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचा संदेश या रॅलीद्वारे देण्यात आला.