नवी दिल्ली : (Pakistan Kirana Hills) पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल राबवण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यानंतरही पाकिस्तानने भारतावर हवाई हल्ले करण्याचे प्रयत्न केले जे भारतीय हवाई दलाने परतवून लावले. या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानचे ११ हवाई तळ उद्ध्वस्त केले. यानंतर अश्या चर्चा सुरु होत्या की, भारताने फक्त हवाई तळच नव्हे तर पाकिस्तानची अणुभट्टी 'किराणा हिल्स'वर ही लक्ष्य केले. मात्र भारतीय हवाई दलाचे डीजीएओ एअर मार्शल ए. के. भारती यांनी हे स्पष्टपणे नाकारत पाकिस्तानच्या अण्वस्त्र तळांना लक्ष्य केलं नसल्याचे म्हटले आहे
पत्रकार परिषदेदरम्यान एअर मार्शल ए.के. भारती यांना विचारण्यात आले की, भारताने किराना हिल्सवर हल्ला केला होता का? तर त्यावर ते म्हणाले, "किराना हिल्समध्ये काही अणुप्रकल्प आहेत हे सांगितल्याबद्दल धन्यवाद, आम्हाला त्याबद्दल माहिती नव्हती. आम्ही किराना हिल्सवर हल्ला केलेला नाही, तिथे काहीही असो, किंवा कालच्या ब्रीफिंगमध्ये आमच्याकडून असे काहीही नमूद करण्यात आले नव्हते."
किराना पर्वतरांगेत नेमकं काय आहे?
किराना पर्वतरांग ही पाकिस्तानची एक प्रचंड खडकाळ पर्वतरांग आहे, जी पाकिस्तान सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाराखालील एक नियुक्त क्षेत्र आहे. ही विशाल पर्वतरांग पाकिस्तानातील सरगोधा जिल्ह्यातील शहरी भाग आणि रबवाह शहराच्या दरम्यान आहे. या पर्वतरांगेच्या तपकिरी रंगामुळे, स्थानिक भाषेत याला 'ब्लॅक हिल' असे म्हणतात. ही पर्वतरांग सुमारे ८० किलोमीटर लांबीची आहे. ब्रिटिश राजवटीतही किराणा टेकड्यांवर बरेच संशोधन झाले. ही पर्वतरांग भारतीय सीमेपासून सुमारे १७० किलोमीटर अंतरावर आहे. युरेनियमच्या शोधात पाकिस्तानने येथे उत्खननही केले होते. १९७० नंतर, पाकिस्तानने स्वतःच्या हेतूंसाठी किराणा टेकड्यांचा वापर सुरू केला. पाकिस्तानच्या अण्वस्त्रांचा एक साठा सरगोधातील किराना टेकड्या मध्ये असल्याचं मानलं जातं. किराना टेकड्यांमध्ये भूमिगत तळ आहे. तो सरगोधा हवाई तळापासून जवळपास ८ किलोमीटर दूर आहे. जवळपास ७० चौरस किमीचा भाग पाकिस्तान सरकारच्या ताब्यात आहे. या भागाचा वापर लष्करी प्रयोग व प्रशिक्षणासाठी सुद्धा केला जातो.आजही हा भाग सार्वजनिक प्रवेशासाठी बंद असून संरक्षण क्षेत्रात मोडतो.