मुंबई : ठाकरे कुटुंबाच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या निष्ठावंत नेत्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या तोंडावर ठाकरेंना हा मोठा धक्का मानला जात आहे.
तेजस्वी घोसाळकर यांनी अनेकदा स्थानिक नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली होती. परंतू, त्याची दखल घेतली गेली नाही. याच नाराजीतून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, आता राजीनाम्यानंतर उबाठा गटाकडून त्यांची मनधरनी करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचीही माहिती आहे.
तेजस्वी घोसाळकर या उबाठा गटाच्या माजी नगरसेविका आहेत. मागील वर्षी त्यांचे पती अभिषेक घोसाळकर यांची मॉरिस नरोन्हा या आरोपीने गोळ्या घालून हत्या केली होती. आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका जाहीर होण्याची शक्यता आहे. अशावेळी तेजस्वी घोसाळकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने मुंबईत उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे. तेजस्वी घोसाळकर आता कोणत्या पक्षात जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.