तामिळ अभिनेते विशाल व्यासपीठावर कोसळले; रुग्णालयात तातडीने दाखल!

    12-May-2025   
Total Views |
 
tamil actor collapses on a huge stage rushed to hospital
 
 
 
मुंबई : तामिळ चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते विशाल रविवारी (११ मे) तामिळनाडूमधील विल्लुपुरम येथे झालेल्या 'मिस कूवगम ट्रान्सजेंडर ब्युटी कॉन्टेस्ट २०२५' दरम्यान अचानक व्यासपीठावर कोसळल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
 
विशाल ‘कांबन विझा’ या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रम सुरू असतानाच ते अचानक बेशुद्ध पडले. त्यानंतर त्यांचे व्यवस्थापक, आयोजक आणि उपस्थित माजी मंत्री के. पोनमुडी यांनी तातडीने मदत केली आणि त्यांना जवळच्याच खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
 
 
रुग्णालयाकडून अधिकृत माहिती अद्याप जाहीर झालेली नसली, तरी विशालचे व्यवस्थापक हरी यांनी रविवारी संध्याकाळी माध्यमांना सांगितले की, “विशालला सध्या २ युनिट्स सलाईन दिले आहेत आणि आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टरांनी दोन दिवस विश्रांती सांगितली आहे. त्यांनी जेवण न केल्यामुळेच ही स्थिती उद्भवली असावी.”
 
 
विशाल जानेवारी २०२५ मध्ये डेंग्यूमधून नुकतेच सावरले होते. त्यामुळे त्यांची तब्येत पुन्हा बिघडल्याचे पाहून चाहत्यांमध्ये अधिक चिंता पसरली आहे. मागील काही आठवड्यांपासून ते सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये थकलेले, अशक्त वाटत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. रविवारी घडलेल्या प्रकारानंतर सोशल मीडियावरूनही चाहत्यांनी आपली चिंता व्यक्त करत, अभिनेत्याच्या तब्येतीसाठी प्रार्थना केल्या आहेत.
 
 
चित्रपटसृष्टीतील मंडळींनीही या घटनेची गांभीर्याने दखल घेतली आहे. सततच्या शूटिंग, प्रमोशन, आणि सार्वजनिक उपस्थितीमुळे कलाकारांवर येणाऱ्या मानसिक आणि शारीरिक ताणाचा हा परिणाम असल्याचे जाणकार सांगत आहेत.



अनिरुद्ध गांधी

ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.