मुंबई : अनुष्का शर्मा ही केवळ एक लोकप्रिय चित्रपट अभिनेत्री नसून एका लष्करी अधिकाऱ्याची कन्या म्हणूनही तिला अभिमान वाटतो. सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमारेषेवरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अनुष्काने भारतीय सैन्याचे मन:पूर्वक कौतुक करत एक भावनिक संदेश प्रसारित केला. त्यानंतर तिची एक जुनी मुलाखत पुन्हा एकदा समाजमाध्यमांवर चर्चेत आली आहे. या मुलाखतीत तिने करगिल युद्धाच्या काळातील अनुभव मोकळेपणाने सांगितले आहेत.
अनुष्का म्हणते, "कारगिल युद्धाचा काळ खूप कठीण होता. मी तेव्हा फार लहान होते – फक्त ११ वर्षांची. पण आईला पाहून मनात खूप भीती निर्माण व्हायची. ती दिवसभर बातम्यांचे चॅनेल लावून ठेवायची आणि जेव्हा कोणाच्या मृत्यूच्या बातम्या यायच्या, तेव्हा तिचा चेहरा काळजीने भरलेला दिसायचा."
तिने सांगितले, "बाबा जेव्हा सीमारेषेवरून फोन करायचे, तेव्हा ते फारसे काही बोलू शकत नसत. पण मी मात्र त्यांच्याशी शाळेच्या गमतीजमती, मित्रमैत्रिणी, आणि माझ्या बालविश्वातील गोष्टी बोलून टाकायचे. त्यावेळी मला त्यांच्या परिस्थितीचं गांभीर्यच समजलं नव्हतं."
"आज मी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते, पण त्याहीपेक्षा मला माझ्या वडिलांचा एक भारतीय सैन्य अधिकारी असल्याचा अधिक अभिमान वाटतो," असंही तिने सांगितलं.
अनुष्काचे वडील कर्नल (निवृत्त) अजयकुमार शर्मा यांनी १९८२ पासून आजवर झालेल्या सर्व महत्त्वाच्या लष्करी मोहिमांमध्ये भाग घेतला आहे. त्यामध्ये 'ऑपरेशन ब्ल्यू स्टार' पासून ते 'कारगिल युद्धा'पर्यंतचा समावेश आहे.