मुंबई : भारत आणि पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे दोन्ही देशांत सध्या तणावपूर्ण परिस्थिती आहे. अशावेळी रजेवर असलेल्या सर्व जवानांना तात्काळ कामावर रुजू होण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, सातारा जिल्ह्यातील एका जवानाचे नुकतेच लग्न झाले असून हळदीच्या ओल्या अंगाने जवान देशसेवेसाठी हजर झाला आहे.
भारताने पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्याचा निर्णय घेत पाकिस्तानातील दहशतवादी तळ उध्वस्त करून त्यांना चांगलाच धडा शिकवला आहे. भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू – काश्मीरमधील (पीओजेके) जवळपास १०० दहशतवादी ठार मारले आहेत.
अशा परिस्थितीत रजेवर असलेल्या सर्व जवानांना तात्काळ सेवेवर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात असलेल्या काळेवाडी गावातील जवान प्रसाद काळे यांचे नुकतेच लग्न झाले. दुसऱ्या दिवशी पूजा आटोपली आणि त्यांना लगेच ड्युटीवर हजर राहण्याबाबत फोन आला. त्यानंतर प्रसाद काळे हळदीच्या ओल्या अंगाने देशसेवेसाठी सीमेवर रुजू झाले.