"भारताचं राफेल विमान पाकिस्ताननं पाडलं का?" या प्रश्नावर ए. के. भारती यांनी दिलं उत्तर! म्हणाले, "प्रश्न हा..."

12 May 2025 13:24:34

India-Pakistan Conflict: Was Rafale fighter jet downed during Operation Sindoor? Here
 
 
नवी दिल्ली : (India-Pakistan Conflict) पहलगाम दहशतवादी हल्ल्याला जबाबदार असणाऱ्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला धडा शिकवण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor)राबवून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळ नेस्तनाबूत केले. यानंतर गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. अखेर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्यानंतर १० मे रोजी युद्धविराम देण्यात आला. यानंतर रविवार, दि. ११ मे रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत ऑपरेशन सिंदूरबाबत विस्तृत माहिती भारतीय सुरक्षा दलांकडून देण्यात आली.  भारताचे राफेल विमान (Rafale fighter jet) पाडण्यात आल्याचा पाकिस्तानी सुरक्षा दलाने दावा केला होता. कालच्या पत्रकार परिषदेत यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर भारतीय हवाई दलाचे डीजीएओ एअर मार्शल ए. के. भारती (DGAO Air Marshal AK Bharti) यांनी उत्तर दिले.
 
भारताचं राफेल विमान पाकिस्तानने पाडलं का?
 
एअर मार्शल ए. के. भारती हे असं म्हणाले की, " आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, आपण युद्धजन्य परिस्थितीत आहोत. नुकसान हा लढाईचा भाग असतो. प्रश्न हा नाही की, आपण काय गमावलं आहे? प्रश्न हा आहे की आपण आपले लक्ष्य साध्य केले आहे का? दहशतवादी तळ लक्ष्य करण्याचं आपलं उद्दिष्ट साध्य केलं का? तर याचं उत्तर निर्विवादपणे हो असे आहे. आपण अजूनही युद्धजन्य परिस्थितीत आहोत. संघर्ष सुरू असताना आपल्या विरोधकांना फायदा होईल, असं काहीही आम्ही बोलू शकत नाहीत. आम्ही यावेळी फक्त इतकेच सांगू शकतो की, आम्ही ठरवलेले उद्दिष्ट आम्ही साध्य केले. आणि आपले सर्व वैमानिक सुरक्षित परत आले आहेत."
 
३५ ते ४० पाकिस्तानी जवान ठार
 
भारतीय लष्कराच्या तिन्ही सैन्यदलांनी पत्रकार परिषद घेत ऑपरेशन सिंदूरबद्दल सविस्तर माहिती दिली. यावेळी एअर मार्शल ए. के. भारती यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, दोन्ही देशांमधील संघर्षादरम्यान नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्यातील ३५-४० जवान मारले गेल्याचीही माहिती दिली.या पत्रकार परिषदेत लष्कर, हवाई दल आणि नौदल या तिन्ही दलांचे डायरेक्टर जनरल उपस्थित होते.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0