नवी दिल्ली : (Air Marshal A. K. Bharti detail response to Pakistan aggression) भारत आणि पाकिस्तानमधील
युद्धविरामानंतर भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांच्या डीजीएमओ यांनी आज १२ मे रोजी दुपारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी एअर मार्शल ए. के. भारती यांनी भारताची लढाई ही पाकिस्तानी सैन्याविरोधात नाही तर दहशतवादाविरोधात असल्याचे म्हटले आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना एअर मार्शल ए.के. भारती म्हणाले की, "भारताची लढाई ही पाकिस्तानी सैन्याविरोधात नाही तर दहशतवादाविरोधात आहे. पाकिस्तानी सैन्याने हस्तक्षेप करून दहशतावाद्यांना साथ देण्याचा निर्णय घेतला हे दुर्दैवी आहे, ज्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावे लागले. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानी सैन्य प्रत्युत्तर देणार याची आम्हाला पूर्ण कल्पना होती. त्यामुळे आमची हवाई सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे तयारीत होती. आमच्या सुरक्षा यंत्रणेनं शत्रूचे ड्रोन्स, क्वॉडकॉप्टर्स पाडले. क्षेपणास्त्रं हवेतच नष्ट केली, अशी माहिती भारती यांनी दिली. पाकिस्तानी सैन्यानं आमच्या तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केल्याने प्रत्युत्तरादाखल आम्हीही त्यांच्या हवाई तळांवर हल्ले केले. त्यात त्यांचं नुकसान झालं, पाकिस्तानात झालेल्या नुकसानासाठी पाकिस्तानी सैन्यच जबाबदार आहे, अशी माहिती देत भारती यांनी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील रहिम यार खान हवाई तळाचा व्हिडीओ दाखवला.
"समझदार के लिए इशारा ही काफी है"
पत्रकार परिषद सुरु होण्यापूर्वी 'याचना नही, अब रण होगा' हे गाणं वाजवण्यात आले होते. त्याआधारे एका पत्रकारानं त्या गाण्यातून तुम्ही नेमका काय संदेश देत आहात, असा प्रश्न विचारला. यावर एअर मार्शल ए.के. भारती यांनी रामचरितमानसमधील ओळींचा उल्लेख करत उत्तर दिलं. ते म्हणाले, "विनय न मानत जलधि जड़, गए तीनि दिन बीति। बोले राम सकोप तब भय बिनु होइ न प्रीति, तो समझदार के लिए इशारा ही काफी है,'' अशा शब्दांत भारती यांनी पाकिस्तानला सूचक इशारा दिला.