दशकभर फरार असलेल्या प्रशांत कांबळे ऊर्फ सुनिल जगताप याला, दहशतवादविरोधी पथकाने दि. 4 मे रोजी अटक केली. नक्षली भोळ्या समाजाला कसे मूर्ख बनवतात, तरुणाईला कसे जाळ्यात ओढतात, त्यांची कार्यपद्धती आणि समाजाला चिथावण्यासाठीचे षड्यंत्र याचे प्रातिनिधिक स्वरूपातले उदाहरण म्हणजे प्रशांत कांबळे. त्याची अटक आणि त्यासंबंधित घटना यांचा घेतलेला मागोवा...
नक्षलींमध्ये सामील झालोय. त्यांच्यासोबत जंगलात राहून काम करतोय. हत्यार चालवण्याचे प्रशिक्षण घेतले आहे. माझ्या संगणकाचं ज्ञान मी त्यांच्यासाठी वापरत आहे. माझे परतीचे मार्ग बंद झाले, मी खूप पुढे गेलो आहे.” संगणकदुरुस्तीसंदर्भात मुंबईला जातो असे सांगून, दि. 15 नोव्हेंबर 2010 रोजी घरबाहेर पडलेल्या प्रशांत कांबळेने 2011 साली घरी फोन करून सांगितलेे. घरातल्यांना हे सांगायचेही कारण आहे, कामानिमित्त मुंबईला गेलेला मुलगा त्याचा संपर्क नाही, तो कुठे गेला, याचा थांगपत्ता लागत नव्हता. त्यामुळे त्याच्या कुटुंंबाने दि. 18 जानेवारी 2011 रोजी पुण्याच्या बंडगार्डन पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली. घरच्यांनी शोधाशोध करून पोलिसांचा आणखीन ससेमिरा मागे लावू नये, म्हणून मग प्रशांतने घरातल्यांना तो नक्षल्यांसोबत काम करतो हे सांगितलेे. प्रशांतने असा फोन केला असल्याचे त्याच्या भावानेच, पोलिसांना चौकशीमध्ये सांगितले. दरम्यान, सिद्ध झाले की पुण्याचाच संतोष शेलार सुद्धा गायब आहे. 2011 साली या दोघांवर प्रतिबंधित माओवादी समुहांशी संबंध यानुसार गुन्हा दाखल झाला. पोलिसांच्या चौकशित निष्पन्न झाले की, प्रशांतने सीपीआय-माओवादी केंद्रीय समितीचा सदस्य मिलिंद उर्फ दिपक तेलतुंबडेसोबत काम केले होते. संतोष हा माओवादी संघटनेत कमांडरपदी होता. त्याला गंभीर आजाराने ग्रासले. पोलिसांकडे शरणागती पत्करत तो परतला पण ‘वॉन्टेड’चा शिक्का लागलेला. प्रशांत कुठे होता?
तर, त्याने स्वतःचे नाव बदलून सुनिल जगताप ठेवले आणि 2018 सालापासून तो रायगडच्या खालापूर तालुक्यातील खानाव गावात राहू लागला. त्याने सुनिल जगताप या नावाने आधारकार्ड आणि मतदानकार्डपण तयार केले. त्याने बाजूच्या गावात छोट्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे दुकान भाड्याने घेतले. गावातल्या लोकांसमोर त्याने सभ्यतेचा, सज्जनतेचा बुरखा पांघरला होता. त्यामुळे आपल्याला वादविवाद आवडत नाही, असेच तो दाखवायचा. कधीही कुठच्याही गोष्टीवर त्याने वादचर्चा, वायफळ गप्पा मारल्या नाहीत की मत प्रदर्शित केले नाही. मुलांना शिकवण्यासाठी, आदिवासी कुटुंबीयांना सहकार्य करण्यासाठी त्याने खानाव गावासोबतच, आजूबाजूचे गोहे आणि नारंगी दत्तवाडी या दोन वाड्यांमध्येही संपर्क वाढवला. काही कुटुंबांना विद्यार्थ्यांना मदतही केली. पण ही मदत म्हणजे अर्थातच मानवतेतून नव्हतीच, तर या अशी थातूरमातूर मदत करून लोकांमध्ये चांगली प्रतिमा निर्माण व्हावी, तसेच या पाड्याच्या लोकांचा विश्वास संपादन केला की, मग तिथल्या तरुणाईला देशद्रोही-समाजद्रोही हिंसक नक्षली विचारधारेसाठी काम करायला प्रवृत्त करायचे, हाच त्यामागचा विचार आणि यासाठीच त्याचे ते प्रयत्न. असाही आपला समाज भोळा आहे. (आणखीन किती काळ असे भोळेपणाच्या नावाखाली अज्ञानी आणि वास्तवापासून दूर राहील, देव जाणे) त्यामुळे त्याच्या खोट्या चांगूलपणावर काही लोकांचा विश्वास बसला.
या प्रशांत ऊर्फ सुनिल जगतापला दि. 4 मे रोजी ‘एटीएस’ने अटक केली आणि महाराष्ट्र हादरला. कारण चंद्रपूर, गडचिरोली हे नक्षल्यांचे केंद्रबिंदू असे आजपर्यंतचे चित्र. मात्र प्रशांत ऊर्फ सुनिलच्या अटकेने आणि एक महिन्यापूर्वी बिहड यादव या नक्षलीची, महाडच्या ‘एमआयडीसी’ भागातून पोलिसांनी केलेली अटक यामुळे वाटते की, निसर्गरम्य शांत आणि धर्मसंस्कृतीने संपन्न असलेल्या रायगडच्या तालुक्यांना नक्षलींनी लक्ष्य बनवले आहे का? मुंबई, पुणे आणि रत्नागिरी अशा महत्त्वांच्या शहरांशी जवळ असलेले, औद्योगिक क्षेत्रातही वेगाने प्रगती करत असलेले रायगड. त्यातही खालापूर हा न्हावाशेवा बंदरामुळे, तसेच पुणे-मुंबई वाहतुकीमुळे अत्यंत महत्त्वाचा तालुका. जंगल, जलसंपत्ती आणि आदिवासी बांधव यांचे लक्षणीय वास्तव्य असलेला खालापूर तालुका. त्यामुळे या परिसरामध्ये जातीय, वर्गीय आणि प्रांतीय द्वेष पसरवणे सोपे, तसेच गुन्हेगारी कारवाया करून लपणेही सोपे, असा विचार नक्षल्यांनी केलाच असावा असे दिसते. या परिसरामध्ये सेवाकार्य करणार्या अनेक स्वयंसेवी संस्था आहेत. तसेच ‘संविधान बचाव’ किंवा मूलभूत अधिकारासाठी संघर्ष, संविधान, लोकशाही, आदिवासी दलित आणि महिला यांच्या हक्कासाठी काम करतो, असे म्हणणार्याही संघटना आहेत. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि रा. स्व. संघ’ या विषयावर मुंबईमध्ये आनंद तेलतुंबडे यांचे व्याख्यान ठेवणारी ‘मूलभूत अधिकार संघर्ष समिती’ही याच पट्ट्यात सक्रिय आहे. सेवाभावी संस्था संदर्भ आठवण्याचे कारण की, प्रशांत कांबळे यांचा काही संस्थांनी सन्मानही केला होता. या संस्थांना प्रशांत कांबळे ऊर्फ सुनिल जगताप याचे खरे चरित्र माहिती नसेल, असे वाटते?
असो, असे वाचनात आले की, खालापूर गावचे सरपंच संदेश पाटील म्हणाले, “आमच्यासमवेत हा नक्षलवादी राहात होता, हे समजल्यावर आम्हाला धक्का बसला. ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’चा तो सक्रिय सदस्य होता.” प्रशांत अंधश्रद्धा निर्मूलनाचे काय काम करत असेल? ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ तसेच ज्या ‘कबीर कलामंचा’शी प्रशांत कांबळे आणि संतोष शेलार संबधित होते, त्या ‘कबीर कलामंच’चीही हिंदू देवधर्म, श्रद्धा, रितीरिवाज आणि हिंदू समाज यांच्याबाबत भूमिका काय आहे, हे जगजाहीर आहे. त्यामुळे प्रशांत खालापूरच्या आदिवासी पाड्यांमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन, मुलांना शिकवणे, मदतीच्या बहाण्याने, पाड्यातील तरुणाईच्या डोक्यात-मनात काय भरवत असेल, हे काय वेगळे सांगायला हवे? अॅन्जेला तेलतुंबडे, दिपक ऊर्फ मिलिंद तेलतुंबडे म्हणा किंवा ‘देशभक्ती युवा मंच’च्या नावाने अरूण भेलके म्हणा किंवा रिपब्लिकन पँथरच्या नावाने सुधीर ढवळे यांची उदाहरणं ताजी आहेत. शोषित वंचित वस्त्यांमधील तरुणांना देशसमाजाविरोधात चिथावणे म्हणजे समाजक्रांती किंवा समाजाचे भले, असे विचार आणि कृत्य करणे याने कधीतरी समाजाचे भले होणार आहे का?
संतोष शेलार आणि प्रशांत कांबळे हे नक्षल्यांचे बळी आणि पुढे त्याच हिंसक देशविरोधी व्यवस्थेचे भाग बनलेले तरुण. आपल्या गरीब आईबापाने रक्त आटवून आपल्याला वाढवलं, त्यांचे काय होईल? हा विचार त्यांच्या मनालाही शिवला नाही. छे! नक्षली हिंसक विचारांनी त्यांच्यातले हे माणूसपणच संपले. बरं नक्षलींमध्ये सामील होत या दोघांनी कोणती क्रांती केली? समाजाचे कुटुंबाचे सोडा, स्वतःचे तरी कोणते भले केले आणि महापुरुषांच्या कोणत्या विचारांना समृद्ध केले? महापुरुषांची नाव घेत माओच्या रक्तरंजित हिंसेकडे वळवणार्याविरोधात समाजात जागृती यायला हवी. देशसमाजासाठी अखंड सावध राहूया. नक्षलवाद संपवायलाच हवा. कारण,
तेरा वैभव अमर रहे माँ
हम चार दिन रहे ना रहे