पद्मश्री वैज्ञानिक सुब्बन्ना अय्यप्पन यांचा संशयास्पद मृत्यू!
11-May-2025
Total Views | 7
बंगळूर : कर्नाटकातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ सुब्बन्ना अय्यप्पन मागच्या काही दिवसांपासून बेपत्ता होते. शनिवार दि. १० मे रोजी त्यांचा मृतदेह मांड्या जिल्ह्यातील श्रीरंगपटना येथे आढळून आला. कावेरी नदीच्या तीरावर त्यांचा मृतदेह आढळून आला असून, एका रहिवाश्याने त्वरीत पोलिसांना या बद्दलची माहिती दिली. पोलिस ज्यावेळेस घटना स्थळी पोहोचले, तेव्हा त्यांना अय्यप्पन यांची दुचाकी, त्यांच्या मृतदेहासह नदीच्या किनाऱ्यावर आढळून आली.
पद्मश्री सुब्बन्ना अय्यप्पन आपल्या पत्नीसह म्हैसुरु येथील विश्वेश्वरय्या नगर येथे राहत होते. ७ मे रोजी त्यांच्या कुटूंबियांनी ते बेपत्ता असल्याची तक्रार विद्यारण्यपुरम पोलीस स्टेशन येथे दाखल केली. पोलिसांच्या प्राथमिक अहवालात तरी असे निदर्शनास आले आहे की अय्यप्पन यांनी आत्महत्या केली आहे, परंतु नेमका त्यांचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांचा मृतदेहाचा पंचनामा म्हैसुरुच्या के आर हॉसपीटल येथे केला जाणार असून, त्यांच्या मृत्यूची सखोल चौकशी केली जाणार आहे.
१० डिसेंबर १९५५ रोजी दक्षिण कर्नाटकातील येलंदूर येथे सुब्बन्ना अय्यप्पन यांचा जन्म झाला होता. मंगळुरुच्या विद्यापीठातून त्यांनी आपले पदवी तथा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले होते. मत्स्यपालन शास्त्र तथा ब्लू रिव्होल्युशनमध्ये त्यांनी अत्यंत महत्वाचे योगदान दिले होते. मत्स्यपालन शास्त्रातील त्यांच्या कामासाठी भारत सरकारने त्यांना २०२२ साली पद्मश्री पुरस्कार दिला होता.