नवी दिल्ली, भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू – काश्मीरमधील (पीओजेके) जवळपास १०० दहशतवादी ठार मारले आहेत. भारताच्या प्रत्युत्तरात जवळपास ३५ ते ४० पाक सैनिकांचाही खात्मा झाला आहे. भारतीय शस्त्रास्त्रांनी थेट इस्लामाबादपर्यंत धडक मारली होती. त्याचवेळी भारतीय नौदलाने आपल्या कराचीस आपल्या लक्ष्यावर ठेवले होते. पुढेही पाकच्या कोणत्याही कृत्यास याहून भयानक उत्तर दिले जाईल, अशी ग्वाही भारतीय सैन्यदलांनी रविवारी सायंकाळी पत्रकारपरिषदेत दिले आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’विषयी भारतीय लष्कराचे डायरेक्टर जनरल मिलिटरी ऑपरेशन्स (डिजीएमओ) लेफ्टनंट जनरल राजीव घई, डायरेक्टर जनरल एअर ऑपरेशन्स एके. भारती आणि डायरेक्टर जनरल नेव्हल ऑपरेशन्स व्हाईस एडमिरल ए. एन. प्रमोद या वरिष्ठ सैन्यअधिकाऱ्यांनी पत्रकारपरिषदेत भारतीय सैन्यदलांनी पाकच्या भूमीवर कसे शब्दश: तांडव केले याची माहिती दिली.
डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई म्हणाले, ऑपरेशन सिंदूरची संकल्पना दहशतवादाच्या गुन्हेगारांना आणि योजनाकारांना शिक्षा करण्यासाठी आणि त्यांच्या दहशतवादी पायाभूत सुविधा नष्ट करण्यासाठी स्पष्ट लष्करी उद्दिष्टासह करण्यात आली होती. भारताच्या या ऑपरेशनमध्ये १९९९ मध्ये इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचे (आयसी-814) अपहरण आणि २०१९ मध्ये पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या ज्यात युसूफ अझहर, अब्दुल मलिक रौफ आणि मुदासिर अहमद यांच्यासह १०० हून अधिक दहशतवाद्यांचा समावेश आहे.
लेफ्टनंट जनरल घई पुढे म्हणाले, भारताने सीमेपलीकडे असलेल्या दहशतवादी लँडस्केपचे अतिशय बारकाईने आणि सूक्ष्मपणे निरीक्षण करण्यात आले आणि दहशतवादी छावण्या आणि प्रशिक्षण स्थळांची ओळख पटवण्यात आली. उदयास आलेली ठिकाणे असंख्य होती, परंतु आम्ही अधिक विचारविनिमय केल्यावर आम्हाला लक्षात आले की यापैकी काही दहशतवादी केंद्रे आता अस्तित्वात नाहीत आणि आमच्याकडून सूड घेण्याच्या भीतीने ती आधीच रिकामी करण्यात आली आहेत. त्यानंतर अधिक बारकाईने आखणी करून सक्रिय असलेल्या ९ दहशतवादी केंद्रांची निवड लक्ष्यासाठी करण्यात आली. यामध्ये भारतीय हवाईदल आणि नौदलानेही अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली, असेही लेफ्टनंट जनरल घई यांनी स्पष्ट केले.
ऑपरेशन सिंदूरचे भारताने ठरविलेले दहशतवादी आणि त्यांचे तळ नष्ट करण्याचे उद्दिष्ट पूर्णपणे साध्य झाल्याचे एअर मार्शल एके. भारती यांनी पत्रकारपरिषदेत सांगितले. ते म्हणाले, ८ आणि ९ तारखेच्या रात्री पाकिस्तानने केलेल्या मोठ्या प्रमाणात ड्रोन हल्ल्यानंतर भारतीय सशस्त्र दलांनी प्रत्युत्तर देण्याचा निर्णय घेतला, जो रात्री १२:३० वाजता सुरू झाला होता. या तळांवर आणि त्याहूनही अधिक ठिकाणी असलेल्या प्रत्येक यंत्रणेला लक्ष्य करण्याची भारताची क्षमता पाकवला दाखवून देण्यात आली आहे. जेथे नुकसान होईल तिथे हल्ला करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर हवाईदलाने जलद, समन्वित, कॅलिब्रेटेड हल्ल्यात पाकच्या संपूर्ण पश्चिम आघाडीवरील त्यांचे हवाई तळ, कमांड सेंटर, लष्करी पायाभूत सुविधा, हवाई संरक्षण प्रणाली रोखली. भारताने ज्या तळांवर हल्ला केला त्यात चकलाला, रफिक, रहीम यार खान यांचा समावेश आहे, ज्यामुळे आक्रमकता सहन केली जाणार नाही असा स्पष्ट संदेश मिळाला. त्यानंतर सरगोधा, भुलारी आणि जेकबाबाद येथे हल्ले करण्यात आले आणि पाकची संपूर्ण कोंडी करण्यात आली. भारतीय सैन्यदलांनी थेट इस्लामाबादपर्यंत धडक दिली आहे, असेही एअरमार्शल भारती म्हणाले.
भारताने पाकच्या लाहोर आणि गुरजनवाला येथील रडार आणि संरक्षण प्रणालीदेखील उध्वस्त केल्या आहेत. भारतीय हवाईदलाने यासाठी अतिशय ‘हायटेक’ लढाऊविमाने आणि शस्त्रास्त्रांचा वापर केला आहे. त्याचप्रमाणे भारतीय हद्दीत घुसू पाहणाऱ्या पाकच्या लढाऊ विमानांनादेखील उध्वस्त करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या मोहिमेत सहभागी भारताचे सर्व लढाऊ पायलट सुखरुप परतले आहेत, असेही एअरमार्शल भारती यांनी यावेळी नमूद केले आहे.
पाकिस्तानने तातडीने युद्धविरामाची विनंती करण्यामागे भारतीय नौदलाने त्यांची केलेली नाकेबंदी निर्णायक ठरल्याचे व्हाइस एडमिरल ए. एन. प्रमोद यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय नौदलाने जलद आणि संरेखित सागरी प्रत्युत्तर दिले आणि ९६ तासांच्या आत मोठी लढाऊ साधने तैनात केली. त्यामध्ये लढाऊ जहाजे, पाणबुड्या आणि सैन्यवाहतूक विमानांचा समावेश होता. भारतीय नौदलाने अरबी समुद्रात आपल्या तयारीची चुणूकही दाखवून दिली होती. सर्वांत मबत्त्वाचे म्हणजे भारतीय नौदलाच्या लक्ष्यावर कराचीसह काही निवडक स्थाने होती. भारतीय नौदलाच्या आक्रमक पावित्र्यामुळे पाक नौदलासह हवाई तुकड्यांना बचावात्मक स्थितीत राहणे भाग पडले. पाकने भारताच्या जमीन, हवा आणि पाण्यावरील क्षमता चांगलीच बघितली आहे. त्यामुळे यापुढे काही आगळीक केल्यास त्याचे परिणाम काय होतील, याचीही त्यांना चांगलीच कल्पना आली असल्याचे व्हाइस एडमिरल ए. एन. प्रमोद यांनी यावेळी नमूद केले आहे.