मंदिरस्थापत्याचा परमबिंदू - रानी की वाव

11 May 2025 16:50:16
मंदिरस्थापत्याचा परमबिंदू - रानी की वाव

भारतामध्ये स्थापत्यकलेचा विकास फारपूर्वीपासून झालेला आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकाराच्या स्थापत्यशैलींमध्ये अनेक राजघराण्यांनी देशाच्या समृद्ध वारशामध्ये भर घातली आहे. गुजरात राज्यातील अहमदाबादच्या जवळील पाटण गावी असलेली रानी की वाव हा त्याचा उत्तम नमुना.


गुजरात राज्यात अहमदाबाद शहरापासून 140 किमी अंतरावर पाटण नावाचे गाव आहे. वस्त्रांमधला अत्यंत सुप्रसिद्ध ‘पटोला’ प्रकार हा याच भागातला. या संपूर्ण राज्यावर सोळंकी राजघराण्याची सत्ता होती आणि त्यांची पाटण ही राजधानी. त्या काळात या गावाला ‘अनहिल्लपूर’ या नावाने ओळखले जायचे. सोळंकी राजघराण्यांनी खूप मोठ्या प्रमाणात मंदिरे आणि बारवांची निर्मिती केली. बारव म्हणजे पाण्याच्या साठ्यासाठी तयार केलेली विहिर, ज्यामध्ये एका किंवा एकापेक्षा अधिक बाजूंनी खालपर्यंत जाण्यासाठी पायर्‍यांची रचना केलेली असते. आपल्याकडे खूप प्राचीन काळापासून, अशा पद्धतीच्या बारव बांधण्याची पद्धत आहे. हा दानधर्मातला एक महत्त्वाचा भाग समजला गेला. राजस्थान आणि गुजरातमध्ये तर मोठ्या संख्येने या बारव बघायला मिळतात.

हे सोळंकी राजघराणे म्हणजेच गुजरातचे चालुक्य, यांनी या संपूर्ण भागावर 350 वर्षांपेक्षा जास्त काळ राज्य केलं. राजा भीमदेव, जयसिंह सिद्धराज, कुमारपाल, इत्यादी पराक्रमी राजे या राजघराणे आपल्याला दिले. कला आणि संस्कृती जपण्याकडे यांचे विशेष लक्ष होते. मोठमोठे कवी आणि विचारवंत यांना, यातल्या अनेक राजांनी राजाश्रय दिला होता. मोढेरा इथले सूर्य मंदिर, सिद्धपूरमधले मंदिर, सहस्त्रलिंगम अशा अनेक वारसास्थळांची निर्मिती याच कालखंडात झाली.

पाटण गावामध्येच सरस्वती नावाची नदी वाहते, आता ही आपली वैदिक सरस्वती नसून, त्या गावातली एक नदी आहे. अनेक शतकांपूर्वी या नदीला प्रचंड पूर आला आणि आजूबाजूचा सगळा भाग या नदीच्या गाळामध्ये काडला गेला. काही दशकांपूर्वी ‘आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया’ यांच्या माध्यमातून, त्या भागामध्ये उत्खनन करण्यात आले. सुरुवातीला काही खांबांचे अवशेष, काही मूर्ती, दगड अशा गोष्टी समोर दिसल्या. सलग दहा-बारा वर्षे काम केल्यानंतर, खाली गाडला गेलेला भारतीय संस्कृतीचा एक प्रचंड मोठा ठेवा आपल्यासमोर मोकळा झाला.

काय सापडलं खाली? 213 फूट लांब आणि सात मजले खोल विष्णूचे मंदिर. राजा भीमदेव पहिला याच्या स्मरणार्थ त्याची राणी उदयामती हिने हे मंदिर बांधले, याचे नाव रानी की वाव. या वारसास्थळाचे महत्त्व लक्षात घेऊन 2014 साली, रानी की वावचा समावेश जागतिक वारसास्थळांच्या यादीत केला गेला.

राणी की वाव ही मरू-गुर्जर स्थापत्यशैलीत बांधलेली असून, भूमिगत स्वरूपाची आहे. तिची रचना अतिशय विचारपूर्वक आणि प्रतीकात्मक पद्धतीने केली आहे. ही बावडी उत्तर-दक्षिण अक्षांवर बांधलेली असून, सात स्तरांमध्ये ती खाली खोल उतरते. प्रत्येक स्तरावर सुंदर कोरीवकाम असलेले अनेक स्तंभ, कमानी आणि मूर्तिकला सजवलेली आहे. ही बावडी सुमारे 64 मीटर लांब, 20 मीटर रुंद आणि 27 मीटर खोल आहे. या बावडीची रचना पावसाचे पाणी संकलित करून, वर्षभर पुरवठा करण्यासाठी केली गेली होती.

जलव्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून ही वास्तू तत्कालीन अभियंते आणि स्थापत्यकारांच्या तांत्रिक कुशलतेचे उत्तम उदाहरण आहे. रानी की वावचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे, प्रत्येक थरावर कोरली गेलेली अत्यंत सुंदर शिल्पे. त्या सरस्वती नदीला आलेला पूर हा आपल्यासाठी वरदान ठरला. कारण त्या गाळात ही जागा गाडली गेली आणि मध्ययुगातल्या मुस्लीम आक्रमकांपासून वाचली. पूर्ण रुपातली-भग्न न झालेली शिल्पे इथे आपल्याला बघता येतात. इथला तिसरा थर हा सर्वांत मोठा थर आहे. याच भागात मोठ्या प्रमाणात आपल्याला वेगवेगळ्या भौमितीय आकृती बघायला मिळतात. एका गोष्टीची नोंद घेणे आपल्याला आवश्यक आहे की, येणारे पर्यटक आणि वस्तू या दोघांच्या सुरक्षिततेसाठी, इथला काही भाग आपल्याला बघता येत नाही.

पण इथे आल्यावर आपल्याला मोहित करणारी गोष्ट म्हणजे इथले शिल्पवैभव. अप्सरा, सुरसुंदरी, अवतार, विष्णूचे 24 व्यूह, दिग्पाल, वसू, भैरव, दुर्गा, पार्वती अशी शेकडो शिल्पे इथे आहेत. यातल्या काहींचा परिचय आपण करून घेऊया.

महिषासुरमर्दिनी - एका पायाने महिषासुराला दाबून त्यावर आघात करत आहे. मनुष्यरुपातला असुर बाहेर काढताना ती दिसते. तिच्या हातात त्रिशुळ, वज्र, बाण, ढाल, भाला, पाश, अंकुश, खड्ग, चक्र अशी आयुधे आहेत. देवीचा सिंह असुरावर मागून हल्ला करतानाही दिसत आहे. एवढे भीषण युद्ध करतानादेखील तिच्या चेहर्‍यावर दिसणार शांतपणा हा महत्त्वाचा भाग. तिच्या ताकदीची प्रचिती या शांतपणातून आपल्याला होते.

श्रीराम - विष्णुने रावणाचा संहार करण्यासाठी घेतलेला हा अवतार. चतुर्हस्त रामाचे शिल्प हे खूप कमी ठिकाणी बघायला मिळते आणि त्यातले एक रानी की वाव या ठिकाणी आहे. हातामध्ये बाण, खड्ग, ढाल आणि धनुष्य धरलेली ही मूर्ती आहे. याच्या भोवती असणार्‍या महिरपित विष्णुचे इतर अवतार कोरलेले दिसतात.

इन्द्र - आठ दिशांपैकी पूर्वेकडचा देव किंवा त्या दिशेचा अधिपति म्हणजे इन्द्र. हातामध्ये वज्र, अंकुश आणि कमंडलू घेतलेला इन्द्र दिसतो. त्याच्या पायाशी त्याचे वाहन म्हणजेच ऐरावतदेखील कोरलेला आहे.

पाटण या गावापासून फक्त 35 किमी अंतरावर राजा भीमदेव पहिला याने बांधलेले मोढेरा मंदिरदेखील आहे. रानी उदयामती हिची कल्पना आणि ती राबवणारे आचार्य स्थपति एकत्र आले आणि येणार्‍या शेकडो पिढ्या आश्चर्य, कौतुक, अभिमान या भावेनेने बघतील, अनुभवतील अशी कलाकृती घडवली. गणित, भूमिती, स्थापत्यशास्त्र, इतिहास, धर्माचा अभ्यास, ग्रंथांचा अभ्यास अशा सर्व गोष्टी इथे एकत्र आलेल्या दिसतात. जागतिक वारसास्थळांच्या यादीत सर्वांत स्वच्छ जागा म्हणून, या जागेचा सन्मान झाला अशी ओळख आपण आपल्या इतर वारसास्थळांचीदेखील निर्माण करूया.



इंद्रनील बंकापुरे
(लेखामध्ये वापरलेले फोटो नाशिकच्या निलय कुलकर्णी यांनी काढलेले आहेत.)
Powered By Sangraha 9.0