भारत एक निर्णायक युद्धाच्या दिशेने

11 May 2025 15:20:16
भारत एक निर्णायक युद्धाच्या दिशेने

मागील तीन आठवड्यापासून जगाचे लक्ष हे दक्षिण आशियाकडे वळले होते. आतापर्यंत रशिया आणि युक्रेन तसेच इस्रायल आणि ‘हमास’ यांच्यातील युद्धामुळे, युरोप आणि पश्चिम आशियातील अनेक नवे भूराजनैतिक समीकरण निर्माण केले आहेत. हे दोन्ही संघर्ष आता अंतिम टप्प्यात असताना, दक्षिण आशियात दोन आण्विक शस्त्र संपन्न राष्ट्रांमध्ये युद्धाची सुरुवात होण्याच्या मार्गावर होती. काश्मीरमधील पहलगाम येथे दि. 22 एप्रिल रोजी भारतीय नागरिकांवर ‘लष्कर-ए-तोयबा’च्या ‘द रेसिस्टन्स फोर्स’च्या दहशतवाद्यांनी केलेला हल्ला आणि त्यानंतर भारताने पाकिस्तानला ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून दिलेले लष्करी उत्तर, यातून भारताने स्त्री शक्तीला आणि धारणांना स्पर्श केला. दि. 7 मे रोजी जेव्हा भारताच्या सैन्याने या ‘ऑपरेशन’ची माहिती कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांच्यामार्फत जगाला दिली, हे पाहून पाकिस्तानी जनरल असिफ मुनेर यांचा धार्मिक ध्रुवीकरणाचा अजेंडा निकामी झाला. काश्मीरमधूनही पहिल्यांदाच या हल्ल्याविरोधात, नागरी समाजाकडून पाकिस्तान विरोधात प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली.



‘ऑपरेशन सिंदूर’ ही भारतीय लष्कराची अशी कारवाई होती की, जी भारतातच नाही तर जगातील सर्व महिलांच्या भावनांना स्पर्श करून गेली. भारताच्या सशस्त्र सेनेत महिलांना दिलेला सन्मान हा जगाने पहिल्यांदाच अनुभवाला. भारत जगातील एक जबाबदार आणि स्वाभिमानी राष्ट्र असून, भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेवर होणार्‍या प्रत्येक प्रकारच्या आक्रमणांना भारत उत्तर देण्यासाठी आज सक्षम आहे. तसेच त्याचे जे परिणाम येतील त्यालाही सामोरे जाण्याची भारताची तयारी आहे. भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानच्या इतर क्षेत्रांत केलेले लष्करी आक्रमण, हे भारताची दहशतवाद विरोधातील आपली कटिबद्धता सिद्ध करतात. पाकिस्तानी सेनेकडून येणार्‍या लष्करी प्रतिक्रियांमुळे हा संघर्ष चिघळण्याची शक्यता निर्माण झाली होती, पण शस्त्रसंधीमुळे हा संघर्ष तुर्तास टळला. हे युद्ध इस्रायल विरुद्ध ‘हमास’ किंवा अजरबैजान विरुद्ध आर्मेनियासारखे असममित युद्ध नव्हते. तर हा संघर्ष दोन सर्वांत व्यावसायिक सैन्यांमधील होता, ज्यांच्याकडे आण्विक क्षमता आहेत.



पाकिस्तानची जिहादी रणनीती

पहलगाममधील दहशतवादी हल्ला हा पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल आसिफ मुनीर यांच्या ‘इकोसिस्टम’द्वारे करण्यात आला असून, नेमके या हल्ल्यामागे अनेक सामरिक नियोजन आहे. मुनीर अलीकडच्या काळात पाकिस्तानातील नागरी व्यवस्था उलथवून न टाकता, सर्वांत शक्तिशाली लष्करप्रमुखांपैकी एक म्हणून उदयास आले आहेत. जनरल झिया-उल-हक यांच्यानंतर, इस्लामी राष्ट्रवादाचे आवाहन करणारे ते सर्वांत कट्टर जिहादी जनरल आहेत. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ‘आयएसआय’चे प्रमुख तसेच, लष्करी गुप्तचर महासंचालक म्हणून कार्य करणारे ते पाकिस्तानचे पहिले लष्कर प्रमुख आहेत. त्यामुळे त्याने त्याच्या रणनीतीचा चांगला विचार केला असेल. आज पाकिस्तानवर जवळपास 130 दशलक्षांचे विदेशी कर्ज आहे. विदेशी मुद्रा भांडार 15 दशलक्ष जो फक्त पुढील तीन महिने टिकेल. तसेच, पाकिस्तान ‘फायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्स’च्या ‘ग्रे लिस्ट’मध्ये असून, पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय दहशतवादाला समर्थन केल्यामुळे, त्यावर बरीच आंतरराष्ट्रीय बंधने आहेत. त्यामुळे विविध अत्यंत कठोर अटी पूर्ण केल्यावरच विदेशी वित्तपुरवठा करणार्‍या संस्था पाकिस्तानला आर्थिक मदत करतात.


आंतराष्ट्रीय नाणे निधीकडून भविष्यात पाकिस्तानला देशाची अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी कर्ज मिळू शकणार होते. या विदेशी कर्जाच्या भरवशावर पाकिस्तानची अर्थव्यवस्था अवलंबून असताना काश्मीरमध्ये जनरल मुनीर यांनी इतकी मोठी हिंमत का केली, यासाठी पाकिस्तानातील मागील काही काळात राजकीय आणि लष्करी अस्थिरता तसेच जागतिक स्तरावर होणारे भूसामरिक बदलाची किनार आहे.

1-पाकिस्तान काश्मीरला आपली गरपसश्रशी तरळप मानत आला आहे. मात्र, 2019 सालानंतर जम्मू आणि काश्मीरचे ‘370’ आणि ‘35अ कलम’ भारत सरकारने रद्द केल्यापासून, आर्थिक विकास आणि एकात्मतेच्या बाबतीत काश्मीर भारतासोबत पुढे जात असताना या भागातील पर्यटन क्षेत्र मोठ्या प्रमाणात विकसित झाल्यामुळे, काश्मिरी तरुण मुख्य प्रवाहात येण्याची सुरुवात झाली. दहशतवादी घटनांमध्ये आणि स्थानिक दहशतवाद्यांच्या भरतीत घट झाली. स्थिर आणि विकसित काश्मीर पाहून पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या पाकव्याप्त काश्मीरमधील जनता ही भारताकडे आकर्षित होणे, ही पाकिस्तानच्या राजकीय आणि लष्करी व्यवस्थेच्या अस्तित्वाला मोठे आव्हान येणार्‍या काळात ठरणार होते. काश्मीरमध्ये 2021 मध्ये घुसखोरी आणि दहशतवादाच्या अशा 120 घटना घडल्या होत्या, ज्या 2024 मध्ये फक्त सात झाल्या. ही परिस्थिती काश्मीरमध्ये मागील काळाच्या तुलनेत लक्षणीय फरक अधोरेखित करते. म्हणून काश्मीरच्या विकासाला अटकाव करून, तेथील स्थानिक तरुणांना आपल्या धर्माच्या आधारावर प्रॉक्सी युद्धासाठी आकर्षित करण्यासाठी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला करण्यात आला.


2- तालिबान राजवटीच्या पहिल्या 21 महिन्यांत पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ल्यांमध्ये 73 टक्के वाढ झाली. ‘तेहरीक-ए-तालिबान’, ‘पाकिस्तान (टीटीपी)’, ‘विद्रोही बलुच लिबरेशन आर्मी’(बीएलए) आणि ‘बलुच लिबरेशन फ्रन्ट’(बीएलएफने) यांनी विविध आघाड्यांवरून पाकिस्तानी आस्थापनांवर, विशेषतः पाकिस्तानी सैन्यावर 2024 साली 521 हल्ले केले. त्यात 852 पाकिस्तानी सेना आणि नागरिक मारले गेले. बलुचिस्तान तसेच खैबर पख्तूनख्वामधून ‘तेहरीक-ए-तालिबानी’कडून पाकिस्तानी लष्करावर होणार्‍या हल्ल्यामुळे, पाकिस्तान लष्कराची विश्वनीयता पाकिस्तानी जनतेतून कमी व्हायला लागली आणि याचा फायदा हा इम्रान खान यांच्या विरोधी पक्ष ‘तेहरीक-ए-इन्साफ’च्या समर्थकांनी उचलण्यास सुरुवात करून, पाकिस्तानी सेनेविरोधात निदर्शने वाढण्यास सुरुवात केली. या अपयशाला वळण देण्यासाठीच मुनीर यांनी काश्मीर प्रश्नाला वाढवण्याचे नियोजन केले.


3- पहलगाममधील हल्ला फक्त काश्मीर प्रश्न आंतरराष्ट्रीय समस्या करण्याचा पाकिस्तानचा हेतू नसून, भारताला आर्थिक आणि लष्करीदृष्ट्या एका विशिष्ट क्षेत्रात ब्लॉक करण्याचा ट्रॅप असण्याच्या शक्यताही नाकारता येत नाही. कारण, भारताचे इस्लामिक जगतात वाढणारे महत्त्व, अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तान विरोधात निर्माण होणारे वातावरण ही पाक सेनेची मोठी हानी आहे. तसेच, बलुचिस्तान आणि अफगाणिस्तानातून खैबर पख्तूनख्वामध्ये भारताचे वाढणारे गुप्तचर नेटवर्कला हा संदेश असू शकतो.

4- बलुचिस्तानमध्ये चिनी नागरिकांवर होणारे हल्ले पाकिस्तानी लष्कर आतापर्यंत थांबू शकली नसल्यामुळे, पाकिस्तानला चीनकडून मिळणारे आर्थिक आणि लष्करी पाठबळ मर्यादित झाले होते. म्हणून चीनला पर्याय म्हणून आसिफ मुनेर यांनी आंतरराष्ट्रीय समर्थनासाठी, अमेरिकेसोबत लष्करी संबंध वाढविण्यासाठी मागील काही दिवसांपासून प्रयत्न सुरू केले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद स्वीकारल्यानंतर, त्यांनी अमेरिका-अफगाणिस्तानातून बाहेर पडताना अंबे गेट बॉम्बस्फोटाची घटना घडली होती. त्यात 13 अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाला होता. या घटनेशी संबंधित ‘आयएसआयएस’चा कमांडर मोहम्मद शरिफुल्लाहला याला पाकिस्तानात अटक करून, अमेरिकेत पाठवून अमेरिकेशी जवळीक साधली. अमेरिकेला मदत केल्याबद्दल ट्रम्प यांनी पाकिस्तानचे आभार मानले. अटक सार्वजनिक होण्याच्या फक्त एक आठवडा आधी, पाकिस्तानला 100.7 दशलक्ष डॉलर्सची मदत अमेरिकेकडून देण्यात आली.



भारताचे धोरण


भारत बर्‍याच काळापासून दहशतवादाच्या लक्ष्मण रेषेच्या जाळ्यात अडकला आहे. याचा अर्थ असा की, जेव्हा ती मर्यादा ओलांडली जाईल तेव्हाच भारत दहशतवाद पुरस्कृत पाकिस्तानविरुद्ध लष्करी कारवाई करेल. भारत हे जगातील चार नंबरचे सशस्त्र दल आणि चार नंबरची अर्थव्यवस्था असलेले राष्ट्र आहे. पाकिस्तानातील दहशतवादाला समर्थन देणार्‍या ‘इकोसिस्टम’वर प्रहार करण्याची आज भारताला योग्य संधी आली आहे. जरी पाकिस्तान चीनचा जवळचा सामरिक सहकारी आहे, तरीही चीन स्वतःच्या हितसंबंधांकडे अधिक झुकलेला आहे आणि चीन कोणत्याही वादात साध्या अडकू इच्छित नाही. हेच कारण आहे की, चीनने भारताविरुद्धच्या कोणत्याही युद्धात कधीही पाकिस्तानला थेट पाठिंबा दिलेला नाही. पाकिस्तान सध्या अस्तित्वाच्या संकटाचा सामना करत आहे. एकेकाळी अमेरिकन उपयुक्ततेच्या केंद्रस्थानी असलेला पाकिस्तान, आता अमेरिकेच्या धोरणांमध्ये दुर्लक्षित झाला आहे. आखाती देशांसोबत इस्लामिक ओळख आणि एकतेच्या लाटेवर स्वार झालेल्या पाकिस्तानला, पश्चिम आशियातील भारताच्या वाढत्या प्रभावाचा मोठा धक्का बसला आहे.


आंतराष्ट्रीय जनमत आज भारताच्या बाजूला असून, भारत आपल्या क्षमतेने पाकिस्तानबरोबरच्या कोणत्याही युद्धाचा निकाल लावू शकतो. पाकिस्तानची खरी समस्या ही तेथील लष्कर आहे आणि तेच खरे लष्करी गणवेशातील दहशतवादी आहेत. पाकिस्तानचा लष्कर प्रमुख पंजाबी आहे, पंतप्रधान पंजाबी आहेत, सर्व नोकरशहा पंजाबी आहेत. अशा परिस्थितीत पंजाबवर हल्ला करणे ही पाकिस्तानसाठी सामान्य गोष्ट नाही. या हल्ल्याद्वारे भारताने हा संदेश दिला आहे की, दहशतवादाविरुद्धचा हल्ला केवळ ‘पीओके’ पुरता मर्यादित राहणार नाही. पाकिस्तानकडून होणार्‍या कोणत्याही हल्ल्याला सामोरे जाण्याची, त्याला उत्तर देण्याची आणि दक्षिण आशियाचा भूगोल परत एकदा बदलण्याची भारताची क्षमता आहे. कारण, हे युद्ध भारताचे आहे आणि भारतालाच लढायचे आहे.



डॉ. तुषार रायसिंग
(लेखक कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे, संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभागात साहाय्यक प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत.)
संपर्क - 8766655424
Powered By Sangraha 9.0