देश,समाज रक्षणासाठी सेवामार्ग कटिबद्ध - गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे

राष्ट्र रक्षणासाठी गुरुचरित्र पारायण उत्साहात

    10-May-2025
Total Views |
देश,समाज रक्षणासाठी सेवामार्ग कटिबद्ध - गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे
नाशिक : अधिकाधिक आध्यात्मिक सेवांच्या माध्यमातून श्री स्वामी समर्थ सेवामार्ग देश आणि समाजाच्या रक्षणासाठी कटिबद्ध आहे असे अभिवचन अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे यांनी दिले.
सेवामार्गाच्या वतीने राष्ट्राच्या रक्षणासाठी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील गुरुपीठामध्ये शनिवार दि.१० मे २०२५ रोजी एक दिवसीय सामूहिक श्रीमद् गुरुचरित्र पारायण घेण्यात आले. या पारायणात सातशे सेवेकर्‍यांनी सहभाग नोंदवला. यावेळी गुरुमाऊली श्री मोरे यांनी सर्वांना संबोधित केले. ते म्हणाले की, विश्वशांती नांदावी, राष्ट्राचे कल्याण व्हावे आणि समाजात सुख,शांती निर्माण व्हावी याकरिताच सेवामार्गातर्फे बहुविध उपक्रम घेण्यात येतात. या उपक्रमांचा एक भाग म्हणून आज सामुदायिक गुरुचरित्र पारायण घेण्यात आले. या सेवेत सहभागी झालेले सारे सेवेकरी भाग्यवान असून राष्ट्र रक्षणासाठी ही सेवा फार महत्त्वाची आहे असे त्यांनी नमूद केले.
२० मे ला बुलढाण्यात मेळावा
राष्ट्र आणि मानव कल्याणासाठी २० मे २०२५ रोजी बुलढाण्यात मातृतीर्थ सिंदखेड राजा येथे महिला सक्षमीकरण मेळावा घेण्यात येणार आहे. जिजाऊ माँसाहेबांना वंदन करण्यासाठी हा उपक्रम घेण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी राष्ट्र रक्षणासाठी आई भगवतीची सर्वोच्च सेवा श्री दुर्गा सप्तशती पाठ वाचन होणार आहे.तरी या मेळाव्यात आणि सामुदायिक सेवेत लाखोंच्या संख्येने माता- भगिनींनी सहभागी व्हावे अशी गुरुमाऊलींनी आज्ञा केली.
मथुरेत भागवत ज्ञानयज्ञ सप्ताह
भगवान श्रीकृष्णाची पुण्यभूमी असलेल्या मथुरा- वृंदावनमध्ये श्री गोवर्धन पर्वताच्या पायथ्याशी सेवामार्गातर्फे राष्ट्र कल्याणासाठी दि. २७ जून ते ४ जुलै २०२५ या काळात भागवत ज्ञानयज्ञ सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले.यावेळी गुरुपुत्र श्री. चंद्रकांतदादा मोरे व श्री. नितीनभाऊ मोरे हेही उपस्थित होते.