मुंबई : भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ‘ऑपरेशन सिंदूर’ या चित्रपटाची घोषणा केल्यानंतर टीकेचा सामना करावा लागलेल्या दिग्दर्शक उत्तम महेश्वरी यांनी अखेर माफी मागितली आहे. शनिवारी सकाळी आपल्या इंस्टाग्राम स्टोरीजवर त्यांनी स्पष्ट केलं की, “हा चित्रपट प्रसिद्धी किंवा कमाईसाठी नव्हे, तर आपल्या जवानांच्या धैर्य, बलिदान आणि नेतृत्वाने प्रभावित होऊन करतो आहे.”
"कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता" – उत्तम महेश्वरी
महेश्वरी यांनी लिहिलं,
"ऑपरेशन सिंदूरवर आधारित चित्रपटाची अलीकडेच केलेली घोषणा ही कोणाच्याही भावना दुखावण्यासाठी किंवा कोणालाही भडकवण्यासाठी नव्हती. एक दिग्दर्शक म्हणून मी भारतीय जवानांचं धैर्य, त्याग आणि नेतृत्वाने भारावून गेलो होतो आणि ही प्रेरणादायी कहाणी लोकांपर्यंत पोहोचवावी अशी माझी इच्छा होती."
"वेळ आणि संवेदनशीलता लक्षात आली नाही"
आपल्या पोस्टमध्ये त्यांनी हेही मान्य केलं की,
"या प्रकल्पामागे प्रसिद्धी किंवा आर्थिक लाभाचा हेतू नव्हता. परंतु, ज्या वेळेला ही घोषणा केली, त्याची संवेदनशीलता आणि वेळ अनेकांना त्रासदायक वाटली असेल, याची मला जाणीव आहे आणि त्याबद्दल मला मनापासून खेद आहे. ही केवळ एक फिल्म नाही, तर हे संपूर्ण राष्ट्राचं भावना आणि देशाची जागतिक प्रतिमा आहे."
पंतप्रधान आणि जवानांचे आभार
आपल्या नोटमध्ये महेश्वरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय सैन्याचे आभार मानले.
"आपल्या देशासाठी रात्रंदिवस ‘नेशन फर्स्ट’ या तत्त्वाने काम करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपले शूर जवान यांचे मी मनापासून आभार मानतो. शहीद झालेल्या कुटुंबांसाठी आणि सीमारेषेवर सतत लढणाऱ्या जवानांसाठी आमच्या प्रार्थना आणि प्रेम सदैव राहील. जय हिंद! जय भारत!"
'ऑपरेशन सिंदूर' पोस्टरमुळे निर्माण झाला वाद
शुक्रवारी निकी विकी भगनानी फिल्म्स आणि द कंटेंट इंजिनीअर या बॅनर्सखाली 'ऑपरेशन सिंदूर' या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली.
पोस्टरमध्ये एक महिला सैनिक वर्दीत दिसते – एक हातात रायफल आणि दुसऱ्या हाताने कपाळावर सिंदूर लावताना दाखवण्यात आली आहे. पार्श्वभूमीत टँक, स्फोट आणि फायटर जेट्सही दाखवले आहेत.
हा चित्रपट ६ आणि ७ मे रोजी भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर केलेल्या कारवाईवर आधारित आहे. या कारवाईत अनेक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. ही कारवाई २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात करण्यात आली होती.
नेटिझन्सकडून चित्रपटाच्या टीमवर जोरदार टीका
इंटरनेटवर पोस्टर व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर याला मोठा विरोध झाला.
एक युजर म्हणाला, "स्वतःची आणि देशाचीही मान खाली घालायला लावा असं वागू नका."
तर दुसरा म्हणाला, "सध्या सुरू असलेल्या युद्धावर आधारित चित्रपट आणि तोही AI जनरेटेड पोस्टरसोबत? हे पूर्णपणे असंवेदनशील आहे."
एका नेटिझनने लिहिलं,
"शर्म वाटली पाहिजे. ऑपरेशन अजून संपलेलं नाही आणि तुम्ही आधीच त्यावर पैसा कमवायला निघालात."
तर दुसरा म्हणाला, "अभिनेता आणि सिलेब्रिटी लोक यावर काही बोलत नाहीत, फक्त असे विषय भांडवल म्हणून वापरून पैसे कमावण्याचं काम करत आहेत."
चित्रपटाकडे देशप्रेमाने पाहण्याची अपेक्षा असताना, त्याचा व्यापारीकरण झाल्यामुळे निर्माण झालेल्या नाराजीमुळे दिग्दर्शकाला अखेर माफी मागावी लागली.
ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.