"मी कधीच माफी मागणार नाही" – ‘ऑपरेशन सिंदूर’वरील पोस्टनंतर अभिनेत्री सेलिना जेटली ट्रोल्सवर भडकली

10 May 2025 19:06:51


actress celina jaitley lashes out at trolls after post on operation sindoor

 
 
मुंबई : भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ कारवाईचे समर्थन केल्यावर अभिनेत्री सेलिना जेटली हिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले. मात्र, ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर देत सेलिनाने ठामपणे सांगितलं – “मी कधीच माफी मागणार नाही.” सध्या ऑस्ट्रियामध्ये असलेल्या सेलिनाने आपल्या देशभक्तीचा अभिमान व्यक्त करत भारतीय सैन्याचे शौर्य आणि बलिदान यांचं कौतुक केलं आहे.
 
 
"दहशतीच्या नावाखाली निरपराध जीव गेले, तेव्हा मी शांत बसू शकत नाही"
शुक्रवारी, सेलिना जेटली हिने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर लिहिलं, “जे लोक मला अनफॉलो करत आहेत किंवा धमक्या देत आहेत कारण मी माझ्या देशासाठी बोलते — त्यांनी हे नीट वाचावं. मी कधीही माझ्या देशाबरोबर उभं राहिल्याबद्दल माफी मागणार नाही. दहशतीच्या नावाखाली निरपराध जीव घेतले जातात, तेव्हा मी गप्प बसू शकत नाही.”
 
 
ती पुढे म्हणाली, “मी प्रत्येक निरपराध जीवाच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त करते – मग ते कोणत्याही देशातले असोत. पण जे हिंसेचं उदात्तीकरण करतात, त्यांच्या पाठीशी मी कधीही उभं राहणार नाही. जर माझं भारतावरील प्रेम तुम्हाला दुखावत असेल, जर दहशतीविरोधातील माझा आवाज तुम्हाला त्रास देत असेल, तर मला अभिमानाने अनफॉलो करा. कारण अशा लोकांनी माझ्या मार्गावर चालावं, असं मी कधीच वाटलेलं नाही.”
 
 
"मी भीती आणि परवानगीशिवाय बोलेन – 'कुमाऊँ रेजिमेंटची मुलगी' अशी गर्वाने ओळख"
ट्रोल्स आणि धमक्यांना उद्देशून सेलिना म्हणाली, “मी तुम्हाला पाहिलं आहे, मी तुम्हाला माफ करते आणि तुमच्या पलीकडे उभी राहते. जय हिंद! मी ‘कुमाऊँ रेजिमेंटची मुलगी’ आहे – आणि अभिमानाने आहे.”
 
 
"ऑस्ट्रियात असले तरी मनाने भारतात"
ऑपरेशन सिंदूरबाबत सेलिनाने याआधी एक भावनिक पोस्टही शेअर केली होती. तिने लिहिलं, “मी ऑस्ट्रियामध्ये असले तरी झोपणं सुद्धा अवघड वाटतंय कारण भारतात शांततेवर हल्ला होतोय. माझं मन अस्वस्थ आहे – वेळेच्या फरकात आणि बातम्यांमध्ये अडकलंय. मी दूर आहे, पण माझं मन, माझं संपूर्ण अस्तित्व भारतासोबत आहे. आपल्या धैर्यवान भारतीय जवानांना सलाम – जे आपल्या आणि अराजकतेच्या मध्ये ढाल बनून उभे आहेत. तुमचं शौर्य हे केवळ रणभूमीपुरतं मर्यादित नाही, तर प्रत्येक थंड रात्रीत, प्रत्येक न बोललेल्या बलिदानात, आणि प्रत्येक न थकता चाललेल्या पावलात दिसतं. आज आपण सुरक्षित आहोत, कारण तुम्ही निर्धाराने उभे आहात.”
 
 
ऑपरेशन सिंदूर – काय घडलं होतं?
एप्रिल महिन्यात जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून ६ मे रोजी भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकिस्तान-व्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी ठिकाणांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. ही कारवाई अत्यंत अचूक आणि मोजकी होती, यामध्ये कोणत्याही पाकिस्तानी लष्करी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलेले नव्हते, असं सैन्याने स्पष्ट केलं.
 
 
सेलिना जेटलीच्या देशभक्तिपूर्ण भूमिकेचे काहींनी कौतुक केलं असलं, तरी काहींनी तिला ट्रोल करत टीका केली. मात्र, “देशाच्या बाजूने बोलणं माझं कर्तव्य आहे, त्यासाठी मी कधीच माफी मागणार नाही” असं म्हणत सेलिनाने ठामपणे ट्रोल्सला उत्तर दिलं आहे.


 
Powered By Sangraha 9.0