पाकिस्तानला मोठा झटका! जिथून सोडत होता ड्रोन तोच तळ उध्वस्त
10 May 2025 11:39:41
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Pakistan Air Base Destroyed) पहलगाम इस्लामिक दहशतवाही हल्ल्याचा बदला म्हणून सुरु केलेल्या भारताच्या ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानमध्ये कहर माजवला आहे. बुधवार रात्री पासून चालू असलेल्या या कारवाईत पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले आहे. शुक्रवार आणि शनिवारी रात्री झालेल्या चकमकीत पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील तीन हवाई तळांवर (सुकूर, रफिकी, रहिम यार खान) भारताने हल्ला केल्याचे निदर्शनास येत असून रावळपिंडीच्या चकवाल जिल्ह्यातील चकलाला आणि मुरीद तर झांग जिल्ह्यातील शोरकोट येथील नूर खान एअरबेसवर हल्ला करत पाकिस्तानची झोप उडवल्याचे पाहायला मिळतेय.
पाकिस्तानी लष्कराच्या मुख्यालयाशेजारी रावळपिंडीतील नूर खान एअरबेस असून त्याचे प्रतीकात्मक महत्त्व अधिक आहे. नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेच संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले की, पाकिस्तान संपूर्ण उत्तर आणि पश्चिम भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहे मात्र भारतही त्याला जोरदार प्रत्युत्तर देत आहे. पाकिस्तानकडून नागरी क्षेत्रे आणि धार्मिक स्थळांना लक्ष्य केले जातेय. नूर खान एअरबेसवरील हल्ल्याने भारताने पाकिस्तानला हे संकेत दिले आहेत की कुठलीच गोष्ट भारताच्या आवाक्याबाहेर नाही.
मुरीद एअरबेस हे ड्रोन ऑपरेशन्सचे केंद्र आहे जिथून पाकिस्तान भारतावर सतत ड्रोन हल्ले करत होता. मुरीद हवाई तळावर ड्रोनमध्ये विशेषज्ञ असलेले अनेक पाकिस्तानी हवाई दलाचे पथके आहेत. हे स्क्वॉड्रन भारतावर ड्रोन हल्ले करण्यात आणि त्यांना मदत करण्यात गुंतलेले असल्याचे मानले जाते. मुरीद एअरबेस हा भारतावर झालेल्या शेकडो ड्रोन हल्ल्यांचे केंद्र असल्याने, या तळावरील भारताचा हल्ला हा पाकिस्तानच्या आक्रमकतेला थेट प्रत्युत्तर आहे. शोरकोटमधील रफीकी एअरबेस- हल्ला झालेला तिसरा पाकिस्तान एअरबेस पंजाबमधील झांग जिल्ह्यातील शोरकोट येथील रफीकी एअरबेस होता. या एअरबेसमध्ये चीनकडून खरेदी केलेल्या जेएफ-१७ आणि मिराज लढाऊ विमानांचे अनेक स्क्वॉड्रन आणि काही युटिलिटी हेलिकॉप्टर आहेत.