- पश्चिम प्रवेश आंतरबदलाचे काम पुढील महिन्यात पूर्ण होणार
10-May-2025
Total Views |
मुंबई: ( Navi Mumbai Airport connectivity ) ‘सिडको’ आणि ‘राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण’ (एनएचएआय) यांच्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे पश्चिमेकडून जाण्यासाठी विकसित करण्यात येत असलेल्या पश्चिम प्रवेश आंतरबदलाचे (वेस्टर्न एन्ट्री इंटरचेंज) काम जून 2025 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. पश्चिम प्रवेश आंतरबदलामुळे आम्र मार्ग आणि उलवे किनारी मार्ग येथून विमानतळाकडे ये-जा करणारी वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
‘एनएचएआय’तर्फे या अंतर्गत आम्रमार्ग, राज्य महामार्ग-54 व राष्ट्रीय महामार्ग-4बी यांच्या विस्तारिकरणाकरिता निधी संकलन आणि अंमलबजावणीसाठी ‘मुंबई-जेएनपीटी पोर्ट रोड कंपनी लि.’ (एमजेपीआरसीएल) या विशेष उद्देश वाहन (एसपीव्ही) कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. ‘एमजेपीआरसीएल’मध्ये ‘एनएचएआय’, ‘जेएनपीटी’ आणि ‘सिडको’ यांची अनुक्रमे 67.04 टक्के, 26.91 टक्के आणि 6.05 टक्के इतकी भागीदारी आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाण्यासाठी या महामार्गाचे विस्तारीकरण ही महत्त्वाचे ठरणार आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिघातील महत्त्वाचे मार्ग आणि विमानतळ यादरम्यान दळणवळण प्रस्थापित होण्यासाठी ‘सिडको’तर्फे काही कनेक्टिव्हीटी प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. ‘अटल सेतू‘ ते विमानतळादरम्यान कनेक्टिव्हीटी निर्माण करण्यासाठी उलवे किनारी मार्ग नियोजित आहे. आम्रमार्ग (राष्ट्रीय महामार्ग 348ए) आणि उलवे किनारी मार्ग येथून विमानतळाकडे ये-जा करणारी वाहतूक सुरळीत चालण्यासाठी ‘एमजेपीरसीएल’च्या प्रकल्पांतर्गत आंतरबदल मार्गाचा समावेश झाला आहे. विमानतळाच्या पूर्वेस राष्ट्रीय महामार्ग 4-बी (राष्ट्रीय महामार्ग 548) सोबत वाहतुकीसाठी रस्त्यासाठी पूर्व प्रवेश आंतरबदल मार्गाचादेखील समावेश करण्यात आला आहे.
दोन लूप, दोन रॅम्पचा समावेश
पश्चिम प्रवेश आंतरबदल मार्ग ‘हाफ क्लोव्हरलिफ’ या प्रकारात चार रस्ते एकमेकांना जोडले जाणार आहेत. या मार्गावर दोन लूप (गोलाकार रस्ते) आणि दोन रॅम्प (सरळ जोड रस्ते) यांचा समावेश आहे. आम्र मार्गावरून विमानतळाच्या दक्षिण बाजूस जाणार्या वाहतुकीकरिता ‘लूप ए’ व आम्र मार्गावरून विमानतळाच्या उत्तर बाजूस जाणार्या वाहतुकीकरिता ‘रॅम्प ए’चा वापर करता येणार आहे. पश्चिम प्रवेश आंतरबदल मार्ग प्रकल्पाअंतर्गत एक अतिरिक्त वाहन मार्ग आणि उलवे नदी प्रवाहावरील लहान पूल यांचा समावेश आहे. पुढील महिन्यात हा मार्ग वाहतुकीकरिता खुला होणे अपेक्षित आहे.
परिपूर्ण कनेक्टिव्हीटी लाभावी याकरिता ‘सिडको’तर्फे अनेक कनेक्टिव्हीटी प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. त्यासाठी मुख्य प्रवेशमार्गांची नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास थेट जोडणी होणार असल्याने त्यातील पश्चिम प्रवेश आंतरबदल आणि पूर्व प्रवेश आंतरबदल हे त्यांपैकी महत्त्वाचे प्रकल्प आहेत. या प्रकल्पांमुळे संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशातून विमानतळाकडे होणारी वाहतूक सुरळीतरीत्या पार पडणे सहज शक्य होणार आहे.
- विजय सिंघल, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको