चित्रपट सृष्टीने गमावला एक कलाकारः ज्येष्ठ मेकअप डिझायनर विक्रम गायकवाड यांचे निधन

10 May 2025 12:19:22
 
Film industry loses an artist: Veteran makeup designer Vikram Gaikwad passes away
 
 
 
 
मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीसाठी अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय पारितोषिक विजेते ज्येष्ठ मेकअप डिझायनर विक्रम गायकवाड यांचे आज १० मे २०२५ रोजी मुंबईत निधन झाले. त्यांनी ७ वेळा राष्ट्रीय पारितोषिक जिंकले होते आणि भारतीय सिनेसृष्टीत मेकअपच्या क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ४.३० वाजता दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.

विक्रम गायकवाड – मेकअपमधील नवजीवन देणारा कलाकार
विक्रम गायकवाड हे नाव म्हणजे चरित्राला रंग देणारा अविस्मरणीय हात. त्यांनी 'शहीद भगतसिंग', 'दंगल', 'ठग्स ऑफ हिंदोस्तान', 'जनता राजा', 'बालगंधर्व', 'काशिनाथ घाणेकर' यांसारख्या अनेक ऐतिहासिक आणि चरित्रप्रधान चित्रपटांमध्ये कलाकारांचा लुक जिवंत केला. 'पानीपत', 'बेल बॉटम', 'उरी', 'डर्टी ब्लॅकमेल', 'पीके', 'सुपर ३०', 'केदारनाथ', 'झांसी' या आणि अशा असंख्य चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या मेकअपच्या जादूने पात्रांना लोकांच्या मनात कोरले.

मेकअपच्या माध्यमातून इतिहास जपणारा हात
फक्त चित्रपटच नव्हे तर ऐतिहासिक मालिकांमध्येही विक्रम गायकवाड यांचे योगदान मोठे होते. छत्रपती शिवाजी महाराज, पवखंड, फत्ते शिकस्त, शेर शिवराज या मराठी मालिकांमधील ऐतिहासिक पात्रांच्या मेकअपसाठी त्यांची विशेष ओळख होती. त्यांनी पात्रांच्या लूकसाठी ऐतिहासिक संदर्भ, पोशाख, त्वचेचा पोत, डोळ्यांतील भाव यांचा बारकाईने अभ्यास केला आणि तो मेकअपद्वारे प्रत्ययास आणला.

राष्ट्रीय पातळीवरील गौरव
विक्रम गायकवाड यांना त्यांच्या अफलातून कामासाठी सात वेळा राष्ट्रीय पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले होते. केवळ हिंदी नव्हे तर बंगाली चित्रपटासाठीही त्यांना २०१३ मध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. ‘३ इडियट्स’, ‘संजू’, ‘भाग मिल्खा भाग’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्येही त्यांनी मेकअप डिझायनर म्हणून आपला ठसा उमटवला होता



Powered By Sangraha 9.0