मोदी फायटर आहेत, ते कुठल्याही परिस्थितीशी लढू शकतील : रजनीकांत

01 May 2025 11:54:14
 
waves 2025 rajinikanth praises pm modi
 
 
मुंबई : (WAVES 2025 - Rajinikanth praises PM Modi) 'पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फायटर आहेत. ते सध्या सुरू असलेल्या परिस्थितीशी लढतील. काश्मीरमध्ये पुन्हा शांतता प्रस्थापित करतील', असा विश्वास सुपरस्टार रजनीकांत यांनी व्यक्त केला आहे. मुंबईत सुरू असलेल्या चार दिवसीय जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेत (वेव्हज) ते बोलत होते.
 
यावेळी रजनीकांत म्हणाले, "वेव्हज २०२५ हा कार्यक्रम होईल की नाही, याबद्दल मी साशंक होतो. सध्या सुरू असलेल्या परिस्थितीत सरकारवर होणारी टीका पाहाता मला तसे वाटत होते. मात्र, माझा विश्वास आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फायटर आहेत. ते यातून नक्की मार्ग काढतील. जम्मू काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करतील, असा मला विश्वास आहे. वेव्हज इंडिया जागतिक मंचावर भारतातील क्रिएटर्सना भरारी घेण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून आकाराला येत आहे. ", असेही ते म्हणाले.
 
भारताच्या पहिल्या जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन शिखर परिषदेचे अर्थात वेव्हज २०२५ शिखर परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे करण्यात आले. याचा उद्देश जगभरातील निर्माते, स्टार्टअप्स, उद्योग नेते आणि धोरणकर्ते एकत्र आणून भारताला मीडिया, मनोरंजन आणि डिजिटल नवोपक्रमाचे जागतिक केंद्र म्हणून स्थान देणे आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0