"जगाला एकत्र आणणारी ही मोठी संधी" जॅकी श्रॉफ : WAVES २०२५ चा भव्य प्रारंभ मुंबईत!

- जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये वेव्स २०२५ ची रंगत; पाक कलाकारांवरील बंदीवरही जैकी श्रॉफ यांचं स्पष्ट मत!

    01-May-2025
Total Views |
 
great opportunity that brings the world together Jackie Shroff WAVES 2025 grand launch in Mumbai
 
मुंबई: ( great opportunity that brings the world together Jackie Shroff WAVES 2025 grand launch in Mumbai ) जगभरातील कलात्मक सहकार्याला चालना देणाऱ्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेन्मेंट समिट वेव्स २०२५ चा शानदार शुभारंभ गुरुवारी मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे झाला. उद्घाटनाच्या दिवशी ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ यांनी उपस्थिती लावून या समिटचे महत्त्व अधोरेखित केले.
 
"जगाला एकत्र आणणारी ही एक मोठी संधी आहे," असं म्हणत श्रॉफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराचं कौतुक केलं आणि या उपक्रमाला आकार देण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाचा उल्लेख केला. चित्रपट, वेब सिरीज, गेमिंग आणि डिजिटल कंटेंटसारख्या सर्जनशील क्षेत्रांमध्ये नवकल्पना, स्टोरीटेलिंग आणि उद्योगवाढीस प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या वेव्स २०२५ या शिखर संमेलनाला जगभरातून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
 
१ मे ते ४ मे दरम्यान होणाऱ्या या समिटचे आयोजन निता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC) आणि इतर मान्यवर ठिकाणी केले जात आहे. ९० हून अधिक देशांतील १०,००० हून अधिक प्रतिनिधी, १००० कंटेंट क्रिएटर्स, ३५० स्टार्टअप्स आणि ३०० मीडियासंस्था यामध्ये सहभागी होत आहेत.
 
उद्घाटन सोहळ्यात ऑस्कर विजेते संगीतकार एम. एम. कीरवाणी यांच्या नेतृत्वाखाली ५० सदस्यीय ऑर्केस्ट्राचा थरारक लाईव्ह परफॉर्मन्स झाला, ज्याने पुढील चार दिवसांच्या सर्जनशील उत्सवाला साजेसा सूर दिला. भारतीय मनोरंजनसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार शाहरुख खान, अक्षय कुमार, आमिर खान, रजनीकांत, आणि दीपिका पदुकोण यांनी देखील या कार्यक्रमात सहभाग घेतला असून, ते विविध पॅनेल चर्चा, शोकेस आणि नेटवर्किंग सत्रांमध्ये भाग घेत आहेत.
 
दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर, जैकी श्रॉफ यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला. "पहलगाम दहशतवादी हल्ल्यात बळी गेलेल्या कुटुंबीयांना माझी श्रद्धांजली. संपूर्ण देश या घटनेने व्यथित झाला आहे," असे ते म्हणाले. तसेच, अलीकडेच भारतात पाकिस्तानी कलाकारांच्या इन्स्टाग्राम अकाउंट्सवर बंदी घालण्यात आली आहे. या संदर्भात विचारले असता श्रॉफ म्हणाले, "सरकारी धोरणांमध्ये आम्ही हस्तक्षेप करू इच्छित नाही. वाद निर्माण करायचा आमचा हेतू नाही."
 
भारतामध्ये माहिरा खान, हानिया आमिर, अली झफर यांसारख्या पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाउंट्स वापरकर्त्यांना पाहता येत नाहीत. कायदेशीर निर्देशांनुसार बंदी घालण्यात आली असल्याचे संदेश त्यांच्या प्रोफाईलवर दिसत आहेत. ही कारवाई पहलगाम हल्ल्यानंतर सोशल मीडियावर पाकिस्तानातून पसरवल्या जाणाऱ्या द्वेषमूलक आणि भारतविरोधी प्रचाराच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली.
 
सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशाच्या सुरक्षेवर परिणाम करणाऱ्या अफवा आणि चुकीची माहिती पसरवणाऱ्या १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनल्सवर देखील बंदी घालण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील सांस्कृतिक संबंध २०१६ च्या उरी हल्ल्यानंतर तणावपूर्ण झाले आहेत. तेव्हापासून पाकिस्तानी कलाकार भारतीय चित्रपटांमध्ये दिसलेले नाहीत. फवाद खान आणि वाणी कपूर यांचा चित्रपट ‘अबीर गुलाल’ देखील भारतात प्रदर्शित करण्यात आलेला नाही.