मुंबई : तुम्ही जेव्हा आशय निर्मिती क्षेत्रात असता त्यावेळी फक्त नकारात्मक गोष्टी दाखवण्यापेक्षा काय जगात काय सुंदर आहे, या गोष्टीही दाखवा, असे परखड मत युट्युबर मायो मौरसकी यांनी व्यक्त केले. जागतिक दृकश्राव्य आणि मनोरंजन परिषद २०२५ (व्हेवज) येथे आयोजित 'बिझनेस ऑफ इन्फ्लुइन्स क्रिएटर्स शेपिंग ग्लोबल कल्चर' या चर्चा सत्रात त्या बोलत होत्या. यावेळी शेफ रणवीर ब्रार, युट्यूबर आकाश जाधव आणि जितेंद्र अडवाणी आदी मान्यवर उपस्थित होते.
त्या म्हणाल्या, " तुम्हाला प्रत्येक देश हा सर्वगुणसंपन्न दिसणार नाही, प्रत्येकाच्या काही न काही त्रुटी असतीलच. पण चांगल्या गोष्टीही आहेत. मी जर भारताबद्दल वाईट गोष्टी माझ्या युट्यूब चॅनलवर दाखवत बसले तर लोक मला नावं ठेवणारी जपानी मुलगी म्हणून लक्षात ठेवतील. मात्र, जेव्हा मी भारताबद्दल इथल्या संस्कृतीबद्दल सांगते तेव्हा लोक माझे नाव लक्षात ठेवतात. अर्थात भारताबद्दल तक्रार करणारे जपानी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आहेत. पण मी काहीतरी वेगळं करण्याचा निर्णय घेतला आहे, असेही त्या म्हणाल्या.
भारतीयांचे आदरतीथ्य ही एक वेगळी संस्कृती आहे. इथे आल्यावर मला स्वतःच्या घरी आल्यासारखे वाटते. कारण इथे मी इतका प्रवास इथे केला आहे, की माझी प्रत्येक राज्यात हक्काची घरे आहेत जिथे मी राहू शकते. भारतीय लोक तुम्हाला स्वतःहून गोष्टी विचारतात. जपानची संस्कृती तितकी मोकळेपणाची नाही, आम्ही जपानी लोक इतक्या लवकर मित्र मैत्रिणी बनवत नाही पण मला भारतात परिस्थिती याउलट दिसली, जेव्हा जेव्हा मी संकटात होते तेव्हा इथल्या लोकांनी मला मदत केली, असेही त्या म्हणाल्या.