क्रिएट इन इंडिया, क्रिएट फॉर वर्ल्ड!

- "वेव्हज"च्या व्यासपीठावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींची गुंतवणूकदारांना साद

    01-May-2025
Total Views |
 
PM Narendra Modi appeal to investors from the Waves platform
 
 
मुंबई : - ( PM Narendra Modi appeal to investors from the Waves platform) भारताच्या प्रत्येक गल्लीत एक कथा दडलेली आहे. इथल्या पर्वतांमध्ये संगीत आहे, इथल्या नद्या कायम गुणगुणत असतात. भारताकडे सांस्कृतिक खजिना आहे. शिक्षण, विज्ञान, संस्कृती, एकता आणि अखंडतेचा मिलाफ आमच्या परंपरेत आहे. आमच्याकडे जगाला देण्यासाठी हर तर्हेचा कॉन्टेन्ट (आशय) आहे. त्यामुळे हीच योग्य वेळ आहे, 'क्रिएट इन इंडिया, क्रिएट फॉर वर्ल्ड' हे स्वप्न साकार करण्याची", अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'वेव्हज'च्या व्यासपीठावरून जगभरातील गुंतवणूकदारांना साद घातली.
 
जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषदेच्या (वेव्हज) उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. बिकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आयोजित या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, एस. जयशंकर, एल. मुरुगन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह मनोरंजन क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. दि. १ ते ४ मेदरम्यान चालणाऱ्या या परिषदेत ९० देशांमधील तब्बल १० हजार प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.
 
मराठी भाषेत महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देऊन पंतप्रधानांनी भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतील सर्व बंधू भगिनींना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. आज गुजरातचाही स्थापना दिवस आहे. जगभरातील गुजराती बांधवानाही शुभेच्छा. आज ९० हून अधिक देशातील कलाकार, क्रिएटर गुंतवणूकदार, धोरणकर्ते येथे उपस्थित आहेत. या सर्वांच्या उपस्थितीत भारतामध्ये मनोरंजन क्षेत्रातील जागतिक अर्थसाखळीचा पाया रचला जात आहे.
 
ही एक खऱ्या अर्थाने, संस्कृती आणि सृजनशीलतेची लाट (वेव्ह) आहे. ११२ वर्षांपूर्वी दि. ३ मे १९१३ रोजी राजा हरिश्चंद्र हा पहिला भारतीय सिनेमा प्रदर्शित झाला. दादासाहेब फाळके यांनी त्याची निर्मिती केली. 'रुस'मध्ये राज कपूर, 'कान' सत्यजित रे आणि ऑस्करमधील 'आर.आर.आर'च्या यशातून भारतीय सिनेमा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचल्याचे सिद्ध होत आहे. भारतीय सिनेमा हा इथल्या संस्कृतीचा आवाज बनून जगाला साद घालत आहे", असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
 
भारतीय युवकांकडे अफाट कल्पनाशक्ती - मोदी
 
- मी अलीकडेच गेमिंग, संगीत, सिने निर्मिती क्षेत्रातील काही तरुणांना भेटलो. त्याच्या चेहऱ्यावर जागतिक सृजनशीलता दिसून आली. त्यांची कल्पनाशक्ती अफाट आहे. ६-७ वर्षांपूर्वी महात्मा गांधीजींच्या १५० व्या जयंतीनिमित्त १५० देशातील गायकांना एकत्र आणून आम्ही मोठा कार्यक्रम सादर केला. 'गांधी-१५०' निमित्ताने भारतीय संस्कृती आणि एकतेची ताकद दिसून आली. तीच ताकद आज वेव्हज परिषदेच्या निमित्ताने दिसून येत आहे. वेव्हच्या निमित्ताने नवतरुणांना जागतिक मनोरंजन विश्वाचे दार खुले झाले आहे.
 
- आई जशी आपल्या मुलाला अंगाई गाऊन संगीताचे धडे देते, त्याप्रमाणे भारतातील क्रिएटिव्ह दुनियेतील व्यक्ती एका युगाच्या स्वप्नांची बांधणी करीत आहेत. विकसित भारताचे हे एक द्योतक आहे. भारताकडे जगाला देण्यासाठी खूप काही आहे, हे यानिमित्ताने आपण दाखवून दिले आहे.
 
- भारताच्या प्रत्येक गल्लीत कहाणी आहे, इथल्या पर्वतांमध्ये संगीत आहे, इथल्या नद्या कायम गुणगुणत असतात. भारताच्या प्रत्येक खेड्यात 'स्टोरी टेलिंग' आहे. भारताकडे सांस्कृतिक खजिना आहे. शिक्षण, विज्ञान, संस्कृती, एकता आणि अखंडतेचा मिलाफ आहे. त्यामुळे ही योग्य वेळ आहे. क्रिएट इन इंडिया क्रिएट फॉर वर्ल्ड, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
 
कल्पना आणि नवनिर्मितीला सर्वाधिक वाव देणार
 
१०० हून अधिक देशात भारतीय सिनेमे प्रसिद्ध होतात. भारत सध्या फिल्म, गेमिंग आणि कॉन्टेन क्रिएटिंगचे मार्केटहब बनले आहे. भारतीय एनिमेशन आणि ग्राफीक्स क्षेत्रासाठी ही एक संधी आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेत एक सकारात्मक लाट (वेव्ह) येत आहे. आम्ही देशात असे वातावरण तयार करीत आहोत, जेथे कल्पना आणि नवनिर्मितीला मोठे मूल्य असेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
 
क्रिएटर्सना आवाहन करताना ते म्हणाले, मानवी संवेदना अबाधित राखण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. आपल्याला माणसाला रोबोट नव्हे संवेदनशील बनवायचे आहे. त्यासाठी गीत, संगीत, कलेला महत्त्व द्यावे लागेल. युवा पिढीला मानवता विरोधी विचारांपासून वाचवण्याची गरज आहे. वेव्हमध्ये ते करण्याची क्षमता आहे. मला विश्वास आहे, हे व्यासपीठ आमच्या युवकांना जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडेल.