मुंबई: अक्षय्य तृतीयाच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे १ मे रोजी सोन्याच्या दरात मोठा फरक निर्माण झाला आहे. ३० एप्रिलच्या तुलनेत २४ कॅरेट सोन्याच्या दरात २,३०० रूपयांचा फरक पडला आहे. सध्या २२ कॅरेट सोन्याचा दर ८७,७०० रूपये प्रति १० ग्रॅम आहे, तर २४ कॅरेट सोन्याचा दर ९५,७०० रूपये प्रति तोळा इतका नोंदवण्यात आला आहे.
२२ एप्रिल रोजी सोन्याच्या किमतीने १ लाख रूपयांचा टप्पा गाठला होता, त्यामुळे ग्राहकांमधील खरेदीचा उत्साह मंदावला होता. त्यानंतर अक्षय्य तृतीयाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी झाली. पण, अशी अचानक किंमतीत झालेली घसरण आश्चर्यकारक ठरते आहे.
जागतिक बाजारातील अनिश्चितता, डॉलर-रुपयांचे व्यवहार आणि व्याजदरातील फरक याचा परिणाम भारतातील सोन्याच्या दरांवर होत असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. त्याबरोबरच आंतरराष्ट्रीय पातळीवरही सोन्याच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत सोन्याच्या किंमतीत अजून चढ-उतार होण्याची शक्यता आहे.
सोनं खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी सध्याचा काळ योग्य मानला जात आहे, कारण मागील काही दिवसांच्या तुलनेत सोन्याच्या किंमती थोड्याफार प्रमाणात खाली आल्या आहेत.