वेव्ह्ज समिट २०२५’ मध्ये झळकले बॉलिवूडचे तारे; शाहरुख, आलिया-रणबीर, रजनीकांत, आमिर, चिरंजीवी यांची उपस्थिती!

    01-May-2025
Total Views |
 
Bollywood actorts at Waves Summit 2025
 
मुंबई: ( Bollywood actorts at Waves Summit 2025) मुंबईतल्या जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये गुरुवारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अ‍ॅण्ड एंटरटेनमेंट समिट २०२५’ (WAVES Summit 2025) चा भव्य प्रारंभ झाला. या ऐतिहासिक समारंभात बॉलिवूडसह संपूर्ण भारतीय सिनेसृष्टीतील तारे एकत्र जमले होते.
 
कार्यक्रमाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून, चार दिवस चालणाऱ्या या समिटमध्ये भारताच्या सृजनशीलतेचा आणि अध्यात्मिक वारशाचा जागतिक मंचावर उलगडा केला जाणार आहे. शाहरुख खानने या समारंभात प्रवेश करताच आयोजकांशी संवाद साधला. त्याच्यासोबत रजनीकांत, आमिर खान, चिरंजीवी, आलिया भट्ट व रणबीर कपूर (जे एकत्र आले होते), तसेच अक्षय कुमार, अनिल कपूर, हेमा मालिनी आणि दीपिका पदुकोणसारख्या दिग्गज कलाकारांनीही हजेरी लावली. सूचना व प्रसारण मंत्रालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या समिटचा उद्देश ‘Connecting Creators, Connecting Countries’ असा असून, भारतातल्या नवउद्योजकांपासून जागतिक सर्जनशील शक्तींना एकत्र आणणे हा या समिटमागील मुख्य हेतू आहे.
 
या समिटमध्ये ९० हून अधिक देशांमधील १०,००० प्रतिनिधी, १,००० सर्जक, ३५० स्टार्टअप्स आणि ३०० पेक्षा अधिक कंपन्या सहभागी होत आहेत. कार्यक्रमात ४२ प्लेनरी सत्रं, ३९ ब्रेकआउट सत्रं आणि ३२ मास्टरक्लासेसद्वारे प्रसारण, माहितीमनोरंजन, AVGC-XR, चित्रपट आणि डिजिटल माध्यमातील विषयांवर चर्चा केली जाणार आहे. याचसोबत भारताच्या इतिहासातील पहिल्या 'ग्लोबल मीडिया डायलॉग'ला देखील यामध्ये स्थान मिळणार असून, २५ देशांमधील मंत्री यामध्ये सहभागी होणार आहेत. ‘WAVES Bazaar’ या जागतिक ई-मार्केटप्लेसमध्ये २,१०० प्रकल्पांसाठी ६,१०० खरेदीदार आणि ५,२०० विक्रेते यांच्यात थेट संपर्क साधला जाणार आहे.
 
पंतप्रधान मोदी ‘Create in India Challenge’मधून निवडल्या गेलेल्या सर्जकांशी ‘Creatosphere’मध्ये संवाद साधणार असून, त्यांनी ‘भारत पॅव्हेलियन’लाही भेट देण्याची शक्यता आहे. ‘WAVES 2025’ हे संपूर्ण जगाच्या मनोरंजनविश्वाला भारताच्या डिजिटल आणि सांस्कृतिक क्षमतेची झलक दाखवणारे महत्त्वाचे व्यासपीठ ठरत आहे.