ट्रम्प यांच्या 'टॅरिफ' धक्क्यानंतर चीनला पुन्हा एकदा 'हिंदी-चिनी भाई-भाई' उक्तीचा साक्षात्कार

    09-Apr-2025   
Total Views |

china appeal to india stand together against us tariff war
नवी दिल्ली : (US - China Tarrif War) अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर १०४ टक्के Reciprocal Tariffs आकारण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी या निर्णयामुळे चीनवर आर्थिक संकट ओढवण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली आहे. अशातच आता ट्रम्प प्रशासनाने छेडलेल्या टॅरिफ युद्धाचा भारताला फटका बसण्याचा अंदाज माहिती व तंत्रज्ञान विभागाचे केंद्रीय सचिव एस. कृष्णन यांनी व्यक्त केला आहे.
 
एकीकडे अमेरिकेने चीनविरोधात टॅरिफ वॉर सुरु केलेले असताना दुसरीकडे मात्र चीनने आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आजवर कायम भारताविरोधी घेत आलेल्या चीनने भारताकडून पाठिंब्याची अपेक्षा केली आहे. ट्रम्प यांच्या आक्रमक भूमिकेसमोर चीनला पुन्हा एकदा मित्रत्वाची उपरती झाली असून "भारत व चीनने या परिस्थितीत एकत्र यायला हवे", असे आवाहन चीनकडून करण्यात आले आहे
 
विकसनशील देशांनी एकत्र यायला हवे
 
चिनी दूतावासाचे प्रवक्ते यू जिंग यांनी एक्सवर अमेरिकेच्या या निर्णयाविरुद्ध एक प्रतिक्रियात्मक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “ट्रम्प प्रशासनाने लादलेल्या आयात शुल्कामुळे निर्माण झालेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी भारत व चीनने एकत्र आले पाहिजे. चीन आणि भारत यांच्यातील आर्थिक आणि व्यापारी संबंध एकमेकांना पूरक आहेत आणि ते परस्पर फायद्यावर आधारित आहेत. अमेरिकेच्या टॅरिफ गैरवापरामुळे जागतिक व्यापारात अस्थिरता निर्माण होत आहे. याविरुद्ध विकसनशील देशांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे. यू जिंग पुढे म्हणाले की, "व्यापार युद्धे आणि शुल्क युद्धांमध्ये कोणीही विजेता नसतो. त्यामुळे सर्व देशांनी बहुपक्षीयतेला पाठिंबा द्यावा आणि एकतर्फीपणाविरुद्ध एकत्र यावे."
 
 
 
 

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\