कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की, ‘अति तेथे माती’ या उक्तीचा अंमल होत असतो. आजकाल मोबाईल वापराचे स्तोम इतके वाढले आहे की, त्यामुळे घराघरात मानसिक रुग्ण भविष्यात निर्माण होतील की काय, अशी रास्त भीती बाळगायला वाव राहतो. एका धक्कादायक आकडेवारीतून या भीतीला पंख फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बदलत्या काळानुसार माणसांच्या स्वभावात आत्मकेंद्रिपणा वृद्धिंगत होत आहे. त्यात मोबाईलने घरातील पालकांना गुंतवून ठेवलेले. आपसूकच त्याचे अनुकरण घरातील मुलेदेखील करू लागली. ज्या मुलांकडे लक्ष देण्यास पालकांना वेळ नाही, अशा घरातील मुलांमध्ये स्वमग्नता वाढण्याच्या प्रमाणात अतिशय वाढ होत आहे. ही खरी कौटुंबिक पातळीवर धोक्याची घंटाच.
नुकताच एक याबाबतीत सर्व्हे करण्यात आला. यात देशनिहाय लहान मुलांमध्ये वाढलेल्या स्वमग्नतेचे प्रमाण (दर एक लाखांमागे) भारतात 715 इतके आढळून आले आहे. ज्या देशात मोबाईलची निर्मिती अधिक होते आणि ते तंत्रज्ञान भारताच्या माथी मारल्याचा आरोप केला जात होता, तो चीन देश या आकडेवारीत भारतानंतर येतो. येथे हे प्रमाण 638 इतके आहे. त्यात माणसांवर आणखी एक आव्हान घिरट्या घालत असते, ते म्हणजे त्याच्या डोक्यावर असलेले कर्ज. आपल्या देशातील दहा माणसांमधील जवळपास किमान आठ माणसे तरी कर्जाच्या ओझ्याखाली दबलेली. यातूनदेखील नैराश्य पसरत चालले आहे. क्रेडिट कार्डच्या वापरात भारतात जानेवारी 2025 अखेर एकूण क्रेडिट कार्ड थकबाकी 2.9 लाख कोटी रुपये होती, असे रिझर्व्ह बँकेच्या अहवालातच नमूद आहे आणि ती चक्क गेल्यावर्षीपेक्षा 13 टक्के वाढली आहे. त्यामुळे मोबाईल वापराची आणि कर्ज घेण्याची अतिमहत्त्वाकांक्षा माणसाला कोठे नेत आहे, याचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे.
आपल्या घरातून आपल्या देशासाठी आपण निर्माण करीत असलेल्या नव्या पिढीला सुदृढ करण्याची जबाबदारी असलेल्या पालकांनी आपल्या पाल्यांवर गांभीर्याने लक्ष देण्याची गरज अधोरेखित करावी लागेल. राहिला प्रश्न कर्जबाजारी होण्याचा, तर तो देखील माणसांच्या विवेकावर अवलंबून आहे. चंगळवादाचा आनंद घेताना हे भान ठेवले, तर नक्कीच यातून मार्ग निघतील.
इच्छा तेथे मार्ग
आपल्याकडे 1 एप्रिल रोजी नव्या आर्थिक वर्षाला प्रारंभ होतो, त्यामुळे नवे व्यवहार होत असतात. भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असलेले उद्योग, व्यापार आणि व्यवसायाच्या क्षेत्रात जी कालानुरूप उलाढाल होत आहे, ती भारतीय अर्थव्यवस्थेत या घटकांचे किती मोठे योगदान आहे, हे सिद्ध करते. एकेकाळी देशात जेव्हा काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांचे शासन होते, तेव्हा भ्रष्टाचाराचा भस्मासूर आपल्या अर्थव्यवस्थेला पोखरत असल्याचे सगळ्या देशाने अनुभवले. यामुळे सामान्य माणसाचे जगणेदेखील असह्य होत असे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार देशात स्थानापन्न झाल्यानंतर त्यांच्या कारकिर्दीपासून भ्रष्टाचार्यांच्या आणि त्यास खतपाणी घालणार्यांच्या झोपा उडाल्या. कधी नव्हे तो भारतात पैसा प्रत्येक माणसाच्या खिशात दिसू लागला आहे. काँग्रेसच्या काळात तो केवळ विशिष्ट घटकांजवळच असायचा. ‘गरिबी हटाव’चे दरवर्षी नारे देत लोकांना मूर्ख बनविण्याचे प्रयास होत असत. मात्र, नरेंद्र मोदी यांनी सुशासन कसे असते, हे दर्शवून भारतीयांचा विश्वास संपादन तर केलाच; मात्र देशाला आणि येथील लोकांना प्रामाणिकपणे सरकारला साथ देण्याची सवय लावली. तेव्हापासून सरकारच्या तिजोरीत लोककल्याणासाठी पैसा जमा होत आहे आणि तो लोककल्याणासाठीच वापरला जात आहे, हे प्रकर्षाने जाणवते. आताच्या ताज्या आकडेवारीनुसार, ‘सीबीडीटी’ने अर्थात ‘सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस’ने मार्चअखेरीस यंदा 92 हजार, 400 कोटी रुपयांची थकबाकी वसूल केली आहे. वैयक्तिक आणि कार्पोरेट करापोटी ती करण्यात आली. 2023-24 साली ही थकबाकी वसुली 75 हजार कोटी रुपयांची होती, हे विशेष. वस्तू आणि सेवा करापोटीदेखील यंदा केंद्र सरकारच्या तिजोरीत मार्च महिन्यात 1.96 लाख कोटी रुपये जमा झाले. गेल्या वर्षीच्या तुलनेत ते 9.9. टक्के अधिक आहेत. यातून हाच निष्कर्ष काढता येतो की, ज्या पद्धतीने सरकार लोकहितासाठी कार्यरत आहे, त्याचा परतावादेखील सरकारला अशी हिताची कामे करण्यासाठी जनतेकडून दिला जातो. त्यात आता डिजिटल व्यवहार होत असल्याने पारदर्शकता अधिक आहे आणि म्हणून लोकांचादेखील सरकारवरील विश्वास दिवसेंदिवस अधिक दृढ होत आहे. इच्छा तेथे मार्ग हेच यातून अधोरेखित होते.
अतुल तांदळीकर