विधिमंडळातील संविधान गौरव चर्चेवरील मुख्यमंत्र्यांचे भाषण पुस्तक रुपात प्रकाशित करा
माजी मंत्री भाई गिरकर यांचे विधानसभा अध्यक्षांना निवेदन
04-Apr-2025
Total Views |
मुंबई : विधिमंडळातील संविधान गौरव चर्चेवरील मुख्यमंत्र्यांचे ऐतिहासिक भाषण १४ एप्रिलपर्यंत पुस्तक रुपात प्रकाशित करावे, अशी मागणीचे निवेदन माजी मंत्री भाई गिरकर यांनी शुक्रवार, ४ एप्रिल रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सादर केले.
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भारतीय संविधानाचा गौरव करण्यासाठी दिनांक २५ आणि २६ मार्च रोजी दोन दिवसीय चर्चा आयोजित करण्यात आली होती. या चर्चेमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांनी भाग घेत विविध विषयांवर आपापले मत व्यक्त केले. याच चर्चेच्या समारोपीय भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संविधानाचा गौरव करताना विविध घटनांचे अचूक दाखले देत सखोल, सर्वोत्कृष्ट आणि ओघवते भाषण करून सभागृहाला मंत्रमुग्ध केले.
विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही याची दखल घेऊन या भाषणाचे पुस्तक रुपात प्रकाशन करण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली होती. याच मागणीच्या अनुषंगाने माजी मंत्री भाई गिरकर यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची विधानभवनात भेट घेतली. हे पुस्तक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १४ एप्रिल रोजी साजऱ्या होणाऱ्या १३४ व्या जयंती निमित्त प्रकाशित करावे आणि ते सर्व लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्य जनतेला उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.