घुसबो... टेकाबो... बोशबो...

भारतात शिरणार्‍या बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्यांचा देशविघातक फॉर्म्युला

    04-Apr-2025
Total Views |
 
Bangladeshis infiltration
 
 
नुकतेच संसदेत आप्रवासन आणि विदेशी नागरिक विधेयक मंजूर करण्यात आले आहे. यानिमित्त देशासमोर गंभीर समस्या असलेल्या रोहिंग्या आणि बांगलादेशींची घुसखोरी करा, स्थायिक व्हा आणि वस्ती निर्माण करा, या भयावह रणनीतीवर आधारित हा विशेष लेख...
 
बांगलादेशी आणि रोहिंग्यांच्या घुसखोरीचा प्रश्न देशभरात दिवसेंदिवस बिकट रूप धारण करताना दिसत आहे. विशेषतः राज्याच्या अनेक शहरी आणि बहुतांशी ग्रामीण भागांत या घुसखोरांनी जणू काही ‘मिनी पाकिस्तान’ आणि ‘मिनी बांगलादेश’ उभारल्यासारखी अवस्था निर्माण केलेली दिसते.रोहिंग्या आणि बांगलादेशींची ही घुसखोरी देशातल्या वाढत्या लोकसंख्या, बेरोजगारीसह कायदा-सुव्यवस्थेला आणि भारताच्या सुरक्षा यंत्रणेला अजगराप्रमाणे विळखा घालणारी आहे. संयुक्त राष्ट्रे निर्वासित उच्चायुक्त (णछकउठ) या जागतिक संघटनेच्या अहवालानुसार भारतात एकंदरीत दोन कोटी अवैध बांगलादेशी आणि 40 हजार रोहिंग्या घुसखोर वास्तव्यास असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. अशा वेळी सजग नागरिक म्हणून आपण सगळ्यांनी देशासह स्वतः वास्तव्यास असलेल्या घरात, सोसायटी, वस्ती-परिसरात आणि कामाच्या ठिकाणी रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरीविरोधात सतर्क राहणे गरजेचे आहे.
 
घुसखोरी तंत्र व कारण
 
भारतातल्या पूर्वोत्तर राज्यांतील आसाम, पश्चिम बंगालसह सीमेलगतच्या राज्यांतून रोहिंग्या आणि बांगलादेशींची मोठ्या प्रमाणात घुसखोरी होते. पश्चिम बंगालमधून देशाच्या इतर भागांत घुसखोरी करण्यासाठीचे तंत्र घुसखोरांना सोपे जाते. कारण, या भागात लाखो बांगलादेशी लोकांनी बस्तान बसविलेलेच आहे. बांगलादेशी घुसखोरांसाठी पश्चिम बंगाल येथील शासकीय यंत्रणेच्या आणि राज्यातल्या राजकीय अनुकूलतेमुळे, त्याचप्रमाणे भाषा आणि राहणीमानाच्या साम्यातून बांगलादेशींना आणि रोहिंग्यांना तेथे घुसखोरीची संधी मिळवून दिली जाते. बांगलादेशी घुसखोरांना भारतात घुसखोरी करण्यासाठी मदत करणार्‍या आणि त्यांना पुरावे निर्माण करून देणार्‍या सर्वाधिक टोळ्या पश्चिम बंगालमध्ये सक्रिय आहेत. या टोळ्यांच्या मदतीने पुरावे निर्माण करून भारतात शिरलेले घुसखोर हे पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जींची हक्काची मतपेटी असल्यामुळे त्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. या घुसखोरांचा भारतातल्या ‘मेट्रो सिटी’पर्यंत पोहोचून तेथील रोजगारात सामील होऊन आपल्यातील इतरांना तिथे आमंत्रित करून आपली संख्या वाढवण्याचा उद्देश बांगलादेशी घुसखोर साध्य करण्याचा प्रयत्न करत आहेत.
 
शहरांकडील घुसखोरीचे आकर्षण आणि ग्रामीण भागातील शिरकाव
 
भारतात घुसखोरी करून आलेल्या बहुतांश घुसखोरांना पहिले आकर्षण असते ते मुंबईचे. अर्थकारणाचे प्रमुख केंद्र असल्याने एकदा का मुंबईत ‘शिरलो की तरलो’ अशी त्यांची धारणा मनोमनी तयार झालेली असते. घुसबो... टेकाबो... बोशबो... अर्थात घुसखोरी करा, स्थायिक व्हा आणि वस्ती निर्माण करा, अशा तयारीने भारतात घुसखोरीनंतर सगळ्या बनावट कागदपत्रांची पूर्तता झाली की या घुसखोरांची पावले मुंबईच्या दिशेने वळतात. परिणामी, गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत लाखो बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्ये बस्तान मांडून आहेत. मुंबई, ठाणे, पुणे आणि नवी मुंबई यांसारख्या अनेक शहरी भागांत खास या घुसखोरांच्या झोपडपट्टी आणि मोहल्ले तयार झालेले दिसतात. पूर्वी अधिकतर शहरी भागांत बांगलादेशी घुसखोरांचा मुक्त संचार आढळून यायचा; मात्र गेल्या काही वर्षांत राज्याच्या ग्रामीण भागांतही या घुसखोरांचा शिरकाव वाढलेला दिसून येतो. प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरांमध्येसुद्धा या घुसखोरांनी बस्तान बसविलेले दिसते. ग्रामीण भागांतील छोटी-मोठी शेतमजुरीची कामे, अंगमेहनतीची कामे, रस्त्याची कामे, वेश्या व्यवसाय इत्यादी क्षेत्रांत बांगलादेशी घुसखोरांचे प्रमाण अधिक आढळून येते. यांपैकी बहुतांश घुसखोर हे हिंदी भाषा बोलत असल्यामुळे आणि त्यांच्या राहणीमानात साम्य असल्यामुळे त्यांना उत्तर भारतीय म्हणून खपवून घेतले जात आहे. त्यामुळे स्थानिक लोकांमध्येही या घुसखोरांच्या बद्दलची फारशी जागरूकता दिसत नाही.गेल्या महिन्यात पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथे महाराष्ट्र सरकारच्यावतीने भारताच्या इतिहासातली सर्वांत मोठी बुलडोझर कारवाई करण्यात आली. एकूण 900 एकर शासकीय जमिनीवर बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांनी या ठिकाणी अवैधरित्या अतिक्रमण केले होते. या अतिक्रमणात चार हजारांहून जास्त घरे व दुकाने त्यांनी निर्माण केली होती.
 
घुसखोर रोहिंग्या आणि बांगलादेशींमुळे सुरक्षतेचे वाजले बारा!
 
भारतात अनेक ठिकाणी सुरक्षतेसाठी खासगी सुरक्षारक्षक, वाहनचालक घरकाम करणारे व्यक्ती, बांधकाम मजूर यांची स्वस्त मजूर म्हणून नेमणूक केली जाते. यांची पार्श्वभूमी तपासणी बंधनकारक केली पाहिजे. कारण, अनेक ठिकाणी बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्या मुस्लीम अवैधरित्या भारतात येऊन कमी मजुरीत कामे करीत आहेत. अनेकदा लोक स्वस्तात मजूर मिळतात म्हणून त्यांची पार्श्वभूमी तपासण्यास टाळाटाळ करतात. मात्र, यामुळे गुन्हेगारी वाढण्याचा धोका आहे. अनेक अवैध स्थलांतरित मजूर, विशेषतः पश्चिम बंगाल आणि आसाममधून आलेले रोहिंग्या मुस्लीम, भारतातील मोठ्या शहरांमध्ये घुसून, वेगवेगळ्या नोकर्‍यांमध्ये सामील होत आहेत. यामुळे घरफोड्या, चोरी, गुन्हेगारी कृत्ये, महिलांवरील अत्याचार आणि दहशतवादी कारवायांसाठी मदत असे प्रकार घडत आहेत. अशा मजुरांची योग्य तपासणी न करता नोकरीवर ठेवणे हा फक्त घरमालकाचाच नाही, तर समाज आणि देशाच्या सुरक्षेचाही गंभीर प्रश्न आहे.
 
वाढत्या गुन्हेगारीत आणि कट्टर धर्मांध दंगलीत सहभाग 
 
बांगलादेशी घुसखोरांपैकी बहुतांश घुसखोर हे भारतातील मुस्लीमबहुल झोपडपट्टी वस्तीक्षेत्रात असलेल्या ठिकाणी वास्तव्यासाठी आहेत. नावट ओळखपत्रांमुळे हे बंगाली घुसखोर उत्तर भारतीय मुस्लीम बिरादरीचे म्हणून स्वतःची ओळख सिद्ध करतात. परिणामी, त्यांना तेथील स्थानिकांकडून सर्व ती प्राथमिक मदत मिळत जाते आणि हळूहळू ते इथेच मिसळूनही जातात; पण घुसखोरी केलेले बहुतांश बांगलादेशी घुसखोर हे वेगवेगळ्या अवैध व्यवसायाशी निगडित आहेत. अनेक गुन्हेगारी कृत्यांमध्ये त्यांचा सहभाग उघडकीस आला आहे.
 
वर्षाच्या सुरुवातीलाच अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणात दि. 19 जानेवारी रोजी मुंबई पोलिसांनी मोहम्मद शहजाद नावाच्या संशयित बांगलादेशी घुसखोराला ठाण्याहून अटक केली होती. एका अधिकृत निवेदनात मुंबई पोलिसांनी सांगितले की, सदर आरोपीने भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश केला आणि बनावट हिंदू ओळखपत्र वापरून त्याने सैफ अली खानच्या घरात काम केले. तसेच अमली आणि नशेच्या पदार्थांच्या विक्री, गोतस्करीसह ‘लव्ह जिहाद’ आणि ‘लॅण्ड जिहाद’सारख्या अनेक गंभीर गुन्ह्यांतसुद्धा बांगलादेशी घुसखोरांचा समावेश चिंताजनक म्हणावा लागेल. दि. 11 ऑगस्ट 2012 रोजी मुंबईतील आझाद मैदानात येथे आंदोलनाच्या नावाने मुस्लीम धर्मांधांनी घडवून आणलेल्या पूर्वनियोजित दंगलीत बांगलादेशी घुसखोरांचा सहभाग असल्याचा अहवाल तपासात दाखल करण्यात आला होता. या दंगलीत सहभागी झालेल्या मुस्लीम धर्मांधांनी 26 पोलीस वाहनांची तोडफोड केली. 1857च्या स्वातंत्र्यलढ्यातील सैनिकांचे स्मारक असलेल्या ’अमर जवान ज्योती’ला मुस्लीम कट्टरपंथीयांनी लाथा मारून तोडफोड केली. रुग्णवाहिका, माध्यमांच्या व्हॅन, बेस्ट बसेस इत्यादींची धर्मांधांनी तोडफोड केली. आझाद मैदान येथील कार्यक्रमात 15 हजारांहून अधिक लोक सहभागी झाले असले, तरी केवळ 62 लोकांकडून नुकसान भरपाई वसूल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांपैकी 18 लोक मुंबईतील, तर 39 लोक नवी मुंबई आणि उपनगरात राहतात, पाच लोक ठाण्यात राहणारे आहेत. त्यांपैकी दोनजणांची नावे वगळण्यात आली आहेत. या दंगलींमधील आरोपींनी पोलीस महिलेचा विनयभंग करणे, त्यांना विवस्त्र करणे, क्रांतिकारकांचा अपमान करणे, पोलीस कर्मचार्‍यांवर हल्ला करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, माध्यमांवर हल्ला करणे इत्यादी गंभीर गुन्हे केले असताना ते जामिनावर बाहेर आहेत. या दंगलीत सहभागी झालेल्या दंगलखोरांकडून पोलीस किंवा प्रशासनाला एक रुपयाही वसूल करता आलेला नाही.
 
समर्थ आणि सुरक्षित भारतासाठी सजग भूमिकेची गरज
 
घुसबो... टेकबो... बोशबो... वृत्तीने घुसखोरी करणार्‍या बांगलादेशी आणि रोहिंग्यांना भारतात थारा देणे हा केवळ निर्वासितांच्या स्थलांतराचा मुद्दा नाही, तर देशाच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण करणारा प्रश्न आहे. बनावट कागदपत्रे, अवैध व्यवसाय, गुन्हेगारी वाढ आणि सामाजिक अस्थिरता यांमुळे या घुसखोरीचे परिणाम दूरगामी ठरू शकतात. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जागरूक राहून, स्थानिक प्रशासनाला सहकार्य करून आणि कठोर कायदेशीर उपाययोजना राबवून या समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. भारत सुरक्षित राहिला, तरच भविष्यातील पिढ्या निर्धास्त राहतील. कारण, मातृभूमीच्या सुरक्षेपेक्षा मोठे दुसरे कोणतेही कर्तव्य नाही!

सागर देवरे
9967020364