मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (VHP huge Morcha against Mumbai Police) "विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाची भूमिका कायम पोलिसांना सहकार्य करण्याची राहिली आहे. मात्र पोलीस प्रशासनातील काही भ्रष्ट आणि हिंदूविरोधी वर्ग संघटनेच्या कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य करतोय. हा वर्ग संपूर्ण पोलीस प्रशासनाला बदनाम करू पाहतोय. या निखाऱ्यांना वेळीच विझवले पाहिजे", असे मत विश्व हिंदू परिषद कोकण प्रांताचे प्रांत मंत्री मोहन सालेकर यांनी व्यक्त केले.
हे वाचलंत का? : ‘सर तन से जुदा’ हेच काँग्रेसचे धोरण – भाजपची काँग्रेसवर टिका
हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर पोलीस प्रशासनाकडून आकस भावनेने होणाऱ्या कारवाईच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषदेचा भव्य मोर्चा मंगळवार, दि. २९ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या दिशेने निघाला. यावेळी हजारोंच्या संख्येने हिंदू बांधव उपस्थित होते. दरम्यान महिला वर्गानेसुद्धा मोठ्या उत्साहात भव्य मोर्चामध्ये सहभाग घेतला होता.
उपस्थितांना संबोधत सालेकर पुढे म्हणाले, "विहिंप आणि बजरंग दल सारख्या संघटनेच्या कार्यकर्त्याना जर अशी वागणूक मिळत असेल, तर समान्य व्यक्ती जेव्हा लव्ह जिहाद किंवा अन्य विषय घेऊन तक्रार नोंदवण्यास जात असेल तेव्हा हिंदूंची स्थिती काय असेल, हा विचार करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनीच राहावे अशी तमाम हिंदूंची इच्छा आहे. पोलीस प्रशासनातील निखाऱ्यांविरोधात वेळीच कारवाई केली नाही, तर सरकारच्या विरोधात आक्रोश मोर्चा काढल्याशिवाय हिंदू गप्प राहणार नाही."
विहिंपचे राष्ट्रीय प्रवक्ते श्रीराज नायर म्हणाले, संघटनेचा कार्यकर्ता जो समाजासाठी उभा राहतो त्यांना अक्षरशः थर्ड डिग्री टॉर्चर सारखी वागणूक दिली जाते. मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा आरोपी अजमल कसाबलाही अशी वागणूक मिळाली नसेल. पोलिसांविरोधात विशेषतः महिला पोलिसांविरोधात नागपुरात काय घडले, ते पोलिसांनी पाहावे. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांविरोधात कधीच कृत्य केले नाही. उलट कार्यकर्त्यांविरोधात सुपारी घेऊन पोलिसांकडून त्यांना लक्ष्य केले जातेय."
मोर्चा दरम्यान बजरंग दलाचे कोकण प्रांत संयोजक रणजीत जाधव, प्रांत सहसंयोजक गौतम रावरिया, मातृशक्ति कोकण प्रांत संयोजिका मनिषा भोईर यांनी देखील उपस्थितांना आपल्या उद्बोधनातून मार्गदर्शन केले. सामुहिक हनुमान चालीसा पठणाने मोर्चाची सांगता झाली.
पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांना निवेदन
वडाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजीव शेजवळ आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विजय भिसे, शैलेंद्र धिवार पोलिसांच्या ताफ्यासह श्रीरामनवमी यात्रेच्या प्रारंभ स्थानी म्हणजेच एंटोप हिल वेअर हाऊसिंग बिल्डींग कम्पाउंड येथे आले आणि यात्रेसाठी तयार करण्यात आलेले साहित्य हिसकावून घेतले. कार्यकर्त्यांनी याला शांततेने विरोध करताच त्यांनी कार्यकर्त्यांना मारहाण सुरु केली. चोर सोडून, संन्याशाला फाशी अशा प्रकारचे धोरण पोलीस प्रशासन राबवत आहे. तरी वडाळा पोलीस ठाण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावे तसेच यापुढील काळात परिषदेच्या कार्यकर्त्यांशी योग्य समन्वय राहील याची पोलिसांनी काळजी घ्यावी, असे निवेदन पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांना विहिंपच्या वतीने करण्यात आले.