नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक राजे रघुजी भोसले यांची तलवार लंडनहून महाराष्ट्रात!

30 Apr 2025 12:46:01
 
Raje Raghuji Bhosale Sword
 
मुंबई : नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापक राजे रघुजी भोसले यांची लंडनमध्ये लिलावात निघालेली ऐतिहासिक तलवार राज्य सरकारने खरेदी केली आहे. यासाठी ४७.१५ लाख रुपये राज्य सरकार देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या 'एक्स' अकाऊंटवर दिलेल्या माहितीनुसार "सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव आणि मुख्यमंत्री कार्यालयात कार्यरत विकास खारगे यांनी वेगाने सूत्रे हलवून ही कामगिरी पूर्ण केली. काही तांत्रिक अडचणी होत्या, त्यामुळे एका मध्यस्थामार्फत ती खरेदी करण्यात आली. यासाठी ४७.१५ लाख रुपये राज्य सरकार देणार आहे."
हे वाचलंत का? -  मुंबई पोलिस आयुक्तपदी आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची नियूक्ती!
 
"ही तलवार मराठा शैलीच्या फिरंग पद्धतीच्या तलवारीचा उत्कृष्ट नमुना आहे. एकधारी पाते, सोन्याचे नक्षीकाम हे त्या तलवारीचे वैशिष्ट्य आहे. युरोपिय बनावटीचे पाते हे त्या काळात प्रसिद्ध होते. या पात्याच्या पाठीवर तळाशी ‘श्रीमंत रघोजी भोसले सेनासाहिबसुभा’ असे सोन्याच्या पाण्याने लिहिले आहे. १८१७ मध्ये नागपुरात ईस्ट इंडिया कंपनीने भोसल्यांच्या खजिन्याची लूट केली होती. त्यात ही तलवार नेली असावी, असा जाणकरांचा अंदाज आहे."
 
रघुजी भोसले हे छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील महत्त्वाचे सरदार
 
"रघुजी भोसले हे छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्यातील एक महत्त्वाचे सरदार होते. त्यांची युद्धनीती आणि शौर्य यावर प्रसन्न होत छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना ‘सेनासाहिबसुभा’ ही उपाधी दिली होती. रघुजी भोसले यांनी १७४५ च्या दशकात बंगालच्या नवाबांविरुद्ध युद्धमोहिमांचे नेतृत्त्व करीत मराठा साम्राज्याचा बंगाल, ओडिशापर्यंत विस्तार केला होता. दक्षिण भारता सुद्धा त्यांनी आपला लष्करी आणि राजकीय दबदबा निर्माण केला होता."
 
 
 
Powered By Sangraha 9.0