एल्फिन्स्टन पूल प्रकल्पग्रस्तांचे आहे त्याच ठिकाणी पुनर्वसन

30 Apr 2025 15:41:30
 
Elphinstone Bridge Parel Mumbai
 
मुंबई: ( Elphinstone Bridge Parel Mumbai ) “मुंबईतील प्रभादेवी येथील १०० वर्षांहून अधिक जुन्या एल्फिन्स्टन पुलाच्या पुनर्बांधणीत परिसरातील १९ इमारती प्रभावित होत आहेत. या प्रभावित इमारतींचा पुनर्विकास ‘एमएमआरडीए’ करणार असून या १९ इमारतींमधील सर्व रहिवाशांना त्याच ठिकाणी घरे मिळणार आहेत,” अशी माहिती मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णय झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
 
दरम्यान शुक्रवार, दि. २५ एप्रिल रोजी पाडकामासाठी एल्फिन्स्टन पूल बंद करण्यात येणार होता. मात्र, स्थानिकांनी या कामाला विरोध दर्शविला. तसेच, आधी पुनर्वसन आणि नंतरच पुलाचे काम असा पावित्रा घेतला. या विषयावर तातडीने तोडगा काढण्यासाठी सोमवार, दि. २८ एप्रिल रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे याविषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव यांच्यासह ‘एमएमआरडीए’, मुंबई महापालिका, ‘एमएसआरडीसी’ संबंधित अधिकारी उपस्थितीत होते. यावेळी मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांनी रहिवाशांचा विषय बैठकीत मांडून मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.
 
यावेळी अ‍ॅड. आशिष शेलार म्हणाले की, “आमचे स्थानिक आ. कालिदास कोळंबकर यांच्या आणि रहिवाशांच्या शिष्टमंडळाने केलेल्या सूचनेनुसार एल्फिन्स्टन पुलाच्या कामात एकूण १९ इमारती बाधित होणार होत्या. पण, सरकारच्या नवीन नियोजनानुसार केवळ दोन इमारती बाधित होणार आहेत. मात्र, आता या पुलाचे काम सुरू होताना स्थानिक विरोध करीत आहेत. त्यांच्या मनात भीती आहे की, पुलाचे काम करताना बाकीच्या १७ इमारतींनाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या सर्व १९ इमारतींचा पुनर्विकास कोणत्याही विकासकाची वाट न पाहता ‘३३ (९)’ अंतर्गत ‘एमएमआरडीए’नेच करावा,” अशी अ‍ॅड. आशिष शेलार यांनी केलेली विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केली आहे.
 
“या प्रकल्पामुळे ज्या दोन इमारतींमधील रहिवाशांची घरे बाधित होणार आहेत, त्यांना कुर्ला येथे घरे अथवा मोबदला देण्याऐवजी त्याच ठिकाणी पुनर्विकासित घरे देण्यात यावीत,” अशी मागणी मंत्री अ‍ॅड. शेलार यांनी केली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी हे मान्य करीत, “दोन इमारतींमधील रहिवाशांना कुर्ला येथे संक्रमण शिबिरात तात्पुरती घरे देण्यात येतील व अन्य १७ इमारतींचा पुनर्विकास करताना बाधित होणार्‍या दोन इमारतींमधील रहिवाशांना त्याच ठिकाणी घरे देण्यात येतील,” असे सांगितले. या निर्णयाचे मंत्री अ‍ॅड. आशिष शेलार यांनी स्वागत केले.
 
 
Powered By Sangraha 9.0