मुंबई, मुंबई भाजपातर्फे दि. १ मे रोजी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. १०६ मंडलांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
भाजपाने संघटनात्मक पातळीवर नवीन मंडल रचना केली असून पूर्वीच्या एका मंडलात तीन नवीन मंडले करण्यात आली आहेत. त्यानुसार नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही करण्यात आल्या आहेत. तरुण कार्यकर्त्यांना भाजपने संधी दिल्यामुळे पक्षात उत्साहाचे वातावरण आहे. या नवनियुक्त मंडल आणि वॉर्ड अध्यक्षांची नुकतीच बैठक घेऊन मुंबई भाजप अध्यक्ष मंत्री आशिष शेलार यांनी सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याच्या सूचना केल्या आहेत.
नियोजनानुसार दि. १ मे राजी मुंबईत १०६ ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करुन ढोल ताशांच्या गजरात चौकाचौकात महाराष्ट्र दिन साजरा करण्यात येणार आहे. काही ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील शाहीरी आणि पोवाडा, गीतांचे कार्यक्रमही आयोजित करण्यात येणार आहेत. तसेच काही ठिकाणी सामाजिक उपक्रम, पुजा असेही कार्यक्रम घेतले जाणार आहेत.